Shivgarjana by Little Boy: सध्या जिकडेतिकडे 'छावा' या एकाच सिनेमाची चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं आहे. 'छावा' पाहिल्यानंतर प्रेक्षकांचं मन भरुन येत आहे. एका चिमुकल्याचा 'छावा' पाहिल्यानंतरचा थिएटरमधील एक व्हिडिओ समोर आला आहे.
'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर चिमुकल्याला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. सिनेमा संपल्यानंतर या चिमुकल्याने थिएटरमध्येच गारद म्हणून महाराजांना मानवंदना दिली. त्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या. चिमुकल्याचा थिएटरमधील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नसल्याचं दिसत आहे. 'छावा' पाहिल्यानंतर भावुक झालेल्या या चिमुकल्याच्या व्हिडिओवर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत.
लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या 'छावा' सिनेमात अभिनेता विकी कौशलनेछत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्नाने या सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, नीलकांती पाटेकर, शुभंकर एकबोटे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'छावा' सिनेमाने तीनच दिवसांत संपूर्ण जगभरात १२१ कोटींचा गल्ला जमवला आहे.