'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अवघ्या एका आठवड्यात सिनेमा रिलीज होतोय. 'छावा' सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या क्लायमॅक्सला सर्वांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येणार यात शंका नाही. जेव्हा छत्रपती शंभूराजांना औरंगजेब कैद करुन त्यांचा छळ करतो, हे मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी वेदनादायी अनुभव ठरणार आहे. या सीनचं शूटिंग करताना विकी कौशलने कशी मेहनत केली, याविषयी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी खुलासा केलाय.
विकीला रात्रभर बांधून ठेवलं अन्..
'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब कैद करुन त्यांना बंदी बनवतो. या सीनचं शूटिंग करताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी रात्रभर विकीचे हात रश्शीच्या साहाय्याने बांधले होते. त्या संपूर्ण सीनच्या शूटिंगवेळेस विकीने रात्रभर मेहनत केली. पुढील दिवशी विकीचे हात सोडण्यात आले तेव्हा त्याचा हात सुन्न झाला होता.विकीची अवस्था बघून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी तब्बल महिनाभर विकीला शूटिंगमधून ब्रेक दिला होता. विकी ठीक झाल्यावर तो पुन्हा शूटिंगला परतला. अशाप्रकारे 'छावा'मधील प्रत्येक सीनसाठी विकीने किती कठोर मेहनत केलीय, याचा अंदाज आपण बांधू शकतो.
'छावा' पाहण्याची उत्सुकता शिगेला
'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. हा सिनेमा आधी ६ डिसेंबरला रिलीज होणार होता. परंतु नंतर 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून विकी कौशलचा 'छावा' रिलीज होतोय. सिनेमातील 'जाने तू' आणि 'आया रे तुफान' ही दोन गाणी रिलीज झाली आहेत. 'छावा'मध्ये विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा याशिवाय संतोष जुवेकर, सारंग साठ्ये या मराठी कलाकारांचा अभिनय पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.