'छावा' सिनेमाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करण्याचा एक सीन दाखवण्यात आला. याशिवाय संभाजी महाराजांचं नृत्यही पाहायला मिळतं. या सीनवरुन मोठा वाद झाला. महाराष्ट्रातील राजकारणी आणि शिवप्रेमींनी या सीनला कडाडून विरोध केला. पण अखेर हा वाद आता थांबला असून 'छावा'मधील तो सीन काढून टाकल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
अखेर 'तो' सीन काढून टाकला
टीव्ही९ मराठीच्या रिपोर्टनुसार मंत्री उदय सामंत यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, "दिग्दर्शकांंनी छावा सिनेमात नाचण्याचा भाग आता काढून टाकलाय. नृत्य दाखवल्यावरुन झालेला वाद आता थांबला असेल." उदय सामंत यांनी शनिवारी (२५ जानेवारी) ट्विट करुन 'छावा'मधील त्या सीनबद्दल त्यांचा आक्षेप नोंदवला होता. अखेर हा सीन आता डिलीट करण्यात आल्याने हा वाद आता थांबेल अशी शक्यता आहे.
काय म्हणाले होते उदय सामंत
उदय सामंत यांनी ट्विट करुन सांगितलं होतं की, "धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे."
"महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!"