विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात विकी कौशलछत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर आता 'छावा' सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'छावा' सिनेमातील जाने तू हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्या प्रेमाचं प्रतिक दाखवणारं हे गाणं आहे. यामध्ये रश्मिका आणि विकी कौशलची केमिस्ट्री पाहून चाहते थक्क झाले आहेत. हे गाणं इर्शाद कमिल यांनी लिहिलं आहे. तर अरजित सिंगने गाण्याला आवाज दिला आहे. ए.आर. रहमान यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. 'छावा' सिनेमातील हे गाणं सोनी म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवरुन प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. काही मिनिटांतच जाने तू गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलरप्रमाणेच हे रोमहर्षक गाणंही लोकप्रिय ठरेल असं दिसत आहे.
'छावा' सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केलं आहे. विकी कौशल, रश्मिका मंदानासोबत या सिनेमात अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर 'छावा'मध्ये मराठी कलाकारांची फौजदेखील आहे. सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, नीलकांती पाटेकर, संतोष जुवेकर हे कलाकार 'छावा'मध्ये दिसणार आहेत.