'छावा' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. ४ दिवसांमध्ये हा सिनेमा रिलीज होतोय. सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय. याशिवाय रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार आहे. 'छावा' सिनेमासाठी मराठमोळे मेकअप आर्टिस्ट श्रीकांत देसाईंनी काम केलंय. श्रीकांत यांनी एका मुलाखतीत 'छावा'च्या शूटिंगचा अनुभव शेअर केलाय.
पॉडकास्टचं डबोलं या मुलाखतीत मराठमोळे श्रीकांत देसाईंनी अनुभव सांगितला की, "छावा एक आव्हानात्मक काम होतं. छत्रपती संभाजी महाराजांचं कॅरेक्टर पडद्यावर दाखवणं आणि तो लूक आपण करतोय. शूटिंगच्या वेळेस कधीकधी मनात यायचं की, आपण महाराजांचा काळ कधी बघितला नाही. आपण फक्त कल्पना करतो की, महाराजांच्या काळात असं होतं. तसं होतं. महाराजांचा तो सगळा काळ आम्ही शंभर दिवसात तिथे अनुभवला. म्हणजे महाराज असते आणि आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असतो तर कसं फील केलं असतं.. ते चार दिवस आम्ही तिथे अनुभवलं."
"रायगडाची ती माणसं आणि त्यादिवशी १५०० लोक सेटवर उपस्थित होते. त्या सर्व लोकांना आम्ही रेडी करायचो. माझी स्वतःची टीम सव्वाशे लोकांची असायची. त्यामध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, बार्बर असायचे वगैरे होते. त्या सीनच्या शूटिंगवेळेस चार दिवस सकाळी साडेचार वाजता आम्हाला कॉलटाइम असायचा. पहाटे साडेचारला आम्ही काम सुरु करायचो ते संपायला सकाळचे नऊ वाजायचे."
"आजूबाजूला ढोल आणि नगारे वाजायचे. मुली नऊवारी साड्या नेसून त्यांनी छान अशी चंद्रकोर लावलेली असायची. सगळीकडे फुलांचा सुवास दरवळायचा. राज्याभिषेक जर महाराजांचा झाला असेल तर तो असाच झाला असेल, हे आम्ही तिथे खरोखर अनुभवलं." 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. जगभरातले शिवप्रेमी हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.