सध्या भारतातील नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांना एका सिनेमाची उत्सुकता आहे तो सिनेमा म्हणजे 'छावा'. (chhaava movie) विकी कौशलची (vicky kaushal) 'छावा' सिनेमात प्रमुख भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा 'छावा' निमित्ताने रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'छावा'चा ट्रेलर (chhaava trailer) आणि पहिल्या गाण्यानंतर सिनेमाचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत छत्रपती संभाजी महाराजांची गर्जना दिसून येतेय.
'छावा'चा नवीन प्रोमो
छत्रपती संभाजी महाराजांना 'पृथ्वी'च्या रुपात सर्वांसमोर आणत 'छावा'चा नवीन प्रोमो शेअर करण्यात आलाय. या प्रोमोत दिसतं की, छत्रपती शंभूराजे मावळ्यांना संबोधताना दिसतात की, "जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधात पाऊल टाकेल तर आई जंगदबेची आण घेऊन सांगतो, ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन भस्म करेन त्याला. मराठ्यांचा अंत नाही तर मुघलांच्या विनाशाची सुरुवात आहे." पुढे शंभूराजे मुघलांशी युद्ध करताना दिसतात.
प्रोमोच्या शेवटी छत्रपती शंभूराजांना महाराणी येसूबाई म्हणतात की, "आम्हाला विश्वास नाही तर खात्री आहे की, औरंगजेबाचा अंत होईल आणि आबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल." अशाप्रकारे अंगावर शहारे आणणारा 'छावा'चा नवीन प्रोमो शेअर करण्यात आलाय. बहुप्रतिक्षित 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. मॅडॉक फिल्मसने सिनेमाची निर्मिती केली असून लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलंय.