दीपिका पादुकोणचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'छपाक'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात दीपिका अॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाने साकारलेल्या पात्राचे नाव मालती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे.
'छपाक' चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जास्त उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर खूप चांगला असून दीपिकाने दमदार अभिनय केला आहे. दीपिकाने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली असून ते ट्रेलरमध्ये पहायला मिळते.
ट्रेलरमध्ये मालतीचा अॅसिड अटॅक झाल्यानंतरचा खडतर प्रवास दाखवण्यात आला आहे. अॅसिड अटॅकनंतर ती स्वतःच्या चेहऱ्याचा तिरस्कार करू लागते आणि नंतर स्वतःवर प्रेमही करू लागते. त्यानंतर मालती देशातील अॅसिड अटॅक झालेल्या मुलींसाठी काम करू लागते. तिच्या या प्रवासात तिला अमोल मदत करतो. ट्रेलरमध्ये अमोल व मालती यांच्यामध्ये प्रेमाची भावना देखील पहायला मिळते. ट्रेलरच्या अखेरीस मालतीच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य त्यांनी माझा चेहरा बदललाय माझं मन नाही हे मनाचा ठाव घेतो.
दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे. यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. तर विक्रांत लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
या चित्रपटात लक्ष्मी अग्रवालचा खडतर प्रवास रुपेरी पडद्यावर अनुभवणे कमालीचे ठरणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक चित्रपट १०, जानेवारी, २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.