गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटामध्ये मुघल बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या केलेल्या छळाचं दाहक चित्रण करण्यात आलं होतं. दरम्यान, या चित्रपटानंतर जनमानसात औरंगजेबाविरुद्ध संतापाची भावना तयार होऊन, त्याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली कबत तोडण्याची मागणी होऊ लागली होती. तसेच त्यावरून अनेक वादविवादही झाले. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या तणावाची परिणती म्हणून नागपूरमध्ये दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी नागपूरमधील हिंसाचारासाठी छावा चित्रपटाला जबाबदार ठरवले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराबाबत बोलताना मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी सांगितले की,नागपूरमध्ये झालेल्या दंगलीसाठी छावा चित्रपट जबाबदार आहे. या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि लेखकांविरोधात कायदेशीर कारवाई केली पाहिजे. या संदर्भात मौलाना रजवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिलं आहे.
या पत्रात मौलाना रजवी यांनी लिहिलं की, जेव्हापासून छावा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे, तेव्हापासून देशातील वातावरण बिघडलं आहे. या चित्रपटात औरंगजेबाची प्रतिमा हिंदूविरोधी दाखवून हिंदू तरुणांना भडकवण्यात आलं आहे. त्यामुळेच हिंदुत्ववादी संघटनांचे नेते ठिकठिकाणी प्रक्षोभक विधानं करत आहेत. त्यामुळेच १७ मार्च रोजी नागपूरमध्ये हिंसाचार झाला. ही बाब खेदजनक आहे.
दरम्यान, छावा चित्रपटावर गृहमंत्र्यांनी त्वरित बंदी घालावी, अशी मागणी मौलाना रजवी यांनी केली आहे. ते म्हणाले की हा चित्रपट अशाच प्रकारे सुरू राहिला तर देशातील इतर भागातही नागपूरसारख्या घटना घडू शकतात. देशातील मुस्लिम औरंगजेबाला आपला आदर्शन मानत नाहीत. आम्ही त्याला केवळ एक राज्यकर्ता मानतो, असेही त्यांनी सांगितले.