Join us

Chhello Show Trailer : ऑस्करसाठी गेलेल्या ‘छेल्लो शो’चा ट्रेलर पाहिलात का? या दिवशी होतोय रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 2:33 PM

Chhello Show Trailer : ऑस्करसाठी ‘छेल्लो शो’ हाच सिनेमा का निवडला? ट्रेलर पाहून मिळेल उत्तर...!!

दिग्दर्शक पान नलिन  (Pan Nalin) यांचा गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा यंदाच्या ऑस्करसाठी (Oscar) भारताकडून अधिकृतपणे पाठवण्यात आला आहे. ऑस्करच्या   परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीसाठी भारताकडून या चित्रपटाची निवड करण्यात आली. तेव्हापासून हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अनेकांनी हा चित्रपट कॉपी आहे, चित्रपटाचा कॉन्टेंट ओरिजनल नाही. त्यामुळे या सिनेमाची ऑस्कर वारीसाठी निवड योग्य नाही, असा सूर काढला. पण या सगळ्या टीकेला  मेकर्सनी ‘आधी बघा आणि मग ठरवा’ या केवळ एकाचं वाक्यात उत्तर दिलं. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

हा सिनेमा नव्हे तर अनुभव आहे, असं म्हणत रॉय कपूर फिल्म्सने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटात 9 वर्षांच्या गुजराती चिमुकल्याची कथा सांगितली आहे. ट्रेलरमध्ये त्याची झलक पाहायला मिळते. सिनेमाबद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण होतं आणि पुढे सिनेमाच्या वेडानं तो झपाटला जातो.  14 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. 

काय आहे कथा  या चित्रपटाची कथा ही नऊ वर्षांच्या समय नावाच्या मुलाची आहे. समय हा सिनेमाच्या जादुई दुनियेकडे आपसूक आकर्षित होतो.  समय त्याच्या वडिलांसोबत रेल्वे स्टेशनवर चहाच्या स्टॉलवर काम करतो. या रेल्वे स्थानकावर  मोजक्याच गाड्या थांबतात, त्यामुळे त्याचं कुटुंब गरिबीत आयुष्य जगत असतं. अभ्यासात समयचं मन रेमनासं होतं. एकदा तो कुटुंबासोबत चित्रपट पाहायला जातो आणि इथूनच तो सिनेमाच्या जादुई दुनियेच्या प्रेमात पडतो. याठिकाणी प्रोजेक्टर आॅपरेटर फैजलशी त्याची भेट होते. समयची आई चांगला स्वयंपाक करते. म्हणून समय आईच्या हातचं जेवण फैजलला खायला देतो आणि त्या बदल्यात तो समयला प्रोजेक्टर रूममधून चित्रपट बघायला देतो. ही प्रोजेक्टर रूमच समयची पहिली सिनेमा शाळा ठरते. वयाच्या नवव्या वर्षी समय शाळा सोडतो आणि प्रोजेक्टर रूममधून सिनेमे पाहतो. सिनेमाबद्दलच्या प्रेमापोटी तो विविध जुगाड करत स्वत: प्रोजेक्टर बनवतो. चित्रपटसृष्टीचं बदलतं चित्र या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. 

‘छेल्लो शो’ची तुलना 1998 मध्ये रिलीज झालेल्या ‘सिनेमा पॅराडिसो’ या इटालियन चित्रपटाशी केली जात आहे. ज्यामध्ये आठ वर्षांचा सॅल्वाटोर हा सिनेमा पॅराडिसो नावाच्या थिएटरमध्ये आपला सर्व वेळ घालवतो. अल्फ्रेडो नावाचा प्रोजेक्टर ऑपरेटर त्याला ऑपरेटरच्या बूथमधून चित्रपट दाखवतो. त्या बदल्यात सॅल्वाटोर हा ऑपरेटरला छोट्यामोठ्या कामात मदत करतो.

टॅग्स :ऑस्करसिनेमा