बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा देशातच नाही तर परदेशातही खूप नाव कमाविते आहे. हॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर प्रियंकाने अभिनयाच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. प्रियंका बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते. मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या रंगावरून तिच्या कुटुंबातील लोक कसे तिची मस्करी करत होते.
प्रियांका चोप्राच्या घरात तिची सर्व भावंडे तिच्यापेक्षा गोरी आहेत. त्यामुळे तिला लहानपणी तिच्या भावंडांकडून मस्करीत काळी, काळी म्हणून चिडवले जायचे. या गोष्टीचे तिला वाईट वाटायचे. मात्र तिने आता फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करणे बंद केले आहे.
प्रियांकाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत फेअरनेस क्रीमच्या जाहिराती केल्याची खंत व्यक्त केली. भारतात फेअरनेस क्रीमची जाहिरात केल्यामुळे तिला एकेकाळी खूप लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. मात्र प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पाऊल टाकल्यापासून फेअरनेस क्रिमच्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक भारतीय कलाकार म्हणून फेअरनेस क्रीमची जाहिरात करणे खूप सामान्य गोष्ट आहे. भारतातल्या अनेक अभिनेत्री फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करतात.
प्रियांका चोप्राने तिच्या 'अनफिनिश्ड' या बायोग्राफीमध्येही या मुद्दावर भाष्य केले आहे. यात तिने लिहिले की, 'दक्षिण आशियामध्ये फेअरनेस क्रीमची जाहिरात करणे खूप सामान्य गोष्ट आहे. कारण फेअरनेस क्रिमचा व्यवसाय खूप मोठा असून अशाप्रकारच्या जाहिराती अनेकजण करतात. अशा जाहिरांतीबाबत दोन विचारप्रवाह आहेत. काहींना अशा जाहिराती करण्यात काहीही गैर वाटत नाही. पण आता लोकांमध्ये जागरुकता वाढत आहे. अशाप्रकारच्या जाहिराती करणे माझ्यासाठी वाईट होते. कारण मी लहान असताना गोरे दिसण्यासाठी टॅल्कम पावडर लावायची, कारण त्यावेळी 'सावळा रंग असणे म्हणजे वाईट असणे' असे मला वाटायचे.
प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती टेस्ट फॉर यू चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग तिने नुकतेच लंडनमध्ये पूर्ण केले आहे. तसेच तिचा नुकताच वी कॅन बी हिरोज हा चित्रपट रिलीज झाला आहे. शेवटची प्रियंका चोप्रा द स्काय इज पिंकमध्ये झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत होते.