विकी कौशलचा 'छावा' सिनेमा जगभरात गाजत आहे. या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले. प्रेक्षकांच्या मनात या सिनेमाने घर केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आणि बलिदानाची शौर्यगाथा 'छावा'मधून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली. या सिनेमात अभिनेता विकी कौशलनेछत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 'छावा'मधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चिमुकल्याच्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'छावा' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. सिनेमा संपल्यानंतर कोणी गारद देताना दिसून आलं तर कोणी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. पण, आता एका चिमुकल्याने 'छावा'मधील क्लायमॅक्स सीन रिएक्रिएट केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत छोटा मुलाचे हात बांधल्याचं दिसत आहे. त्याच्या बनियनवर लाल डाग दिसत आहेत. या चिमुकल्याने 'छावा'मधील सीन रिक्रिएट केला आहे.
या व्हिडिओत तो चिमुकला 'छावा'च्या क्लायमॅक्स सीनमधील कवी कलश आणि छ. संभाजी महाराजांमधील संवाद बोलताना दिसत आहे. "छावा सिनेमाची सगळ्यात मोठी कमाई ही आहे. बाल मनावर इतिहासाची छाप पडावी...इतिहास या लेकरांना उमगतंय. धन्य झालो आपण", असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. चिमुकल्याचा हा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
लक्ष्मण उतेकरांचं दिग्दर्शन असलेल्या 'छावा' सिनेमात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. संतोष जुवेकर, सुवत्र जोशी, निलकांती पाटेकर, सारंग साठ्ये, शुभंकर हे मराठी कलाकार आहेत.