Join us  

बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांमधील क्लॅश प्रेक्षकांसाठी ठरणार मेजवानी!

By संजय घावरे | Published: July 17, 2024 8:33 PM

पुढील पाच महिन्यांमध्ये काही बिग बजेट चित्रपट होणार प्रदर्शित

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जूनच्या अखेरीस रिलीज झालेल्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने १००० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवत सिनेसृष्टीला या वर्षातील ब्लॉकबस्टर दिला आहे. पुढील पाच महिन्यांमध्ये काही बिग बजेट चित्रपटांमध्ये क्लॅश होणार आहे, पण प्रेक्षकांसाठी मात्र ही मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

'पुष्पा २' हा चित्रपट पुढे गेल्याने यंदाच्या उत्तरार्धातील बऱ्याच चित्रपटांच्या प्रदर्शनाचे गणित बदलले आहे. काही चित्रपट ठरलेल्या वेळेपूर्वी, तर काही अगोदर निश्चित केलेल्या तारखांपेक्षा उशीरा प्रदर्शित होणार आहेत. मोठ्या चित्रपटांमध्ये क्लॅश होणार असल्याने सिनेसृष्टीत टेन्शन असले तरी प्रेक्षकांची चंगळ होणार असल्याचे चित्रपट जाणकारांचे म्हणणे आहे. येत्या शुक्रवारी विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या बहुचर्चित 'बॅड न्यूज'समोर रणवीर शौरी आणि मनोज जाशींचा 'गोध्रा' रिलीज होईल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 'द साबरमती रिपोर्ट', 'औरों में कहां दम था' आणि 'उलझ' या चित्रपटांद्वारे विक्रांत मस्सी-राशी खन्ना, अजय देवगण-तब्बू आणि जान्हवी कपूर-गुलशन देवैया हे कलाकार आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

दुसऱ्या आठवड्यात 'वो लडकी है कहां' हा एकमेव चित्रपट येणार आहे. स्वातंत्र्यदिनी 'वेदा', 'स्त्री २', 'खेल खेल में' आणि 'डबल इस्मार्ट' यांच्यात चौरंगी लढत होईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'चा सामना 'बीटलज्यूस २' या फँटसी हॉरर कॉमेडी हॉलिवूडपटाशी होईल. नोव्हेंबरमध्ये अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत 'सिंघम अगेन' आणि कार्तिक आर्यनच्या 'भुलभुलैया ३'मध्ये लढत रंगेल. दोन्ही चित्रपटांचे जॉनर भिन्न असले तरी दोन्हींच्या यापूर्वीच्या भागांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार आणि कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कौल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १५ ऑगस्टला रिलीज होणारा 'पुष्पा २' ६ डिसेंबरला रिलीज होणार असल्याने विकी कौशलच्या 'छावा'समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दोन्ही चित्रपटांमध्ये रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असल्याने आपल्या दोन महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये क्लॅश होणार असल्याचे टेन्शन तिला आहे. डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात 'सितारे जमीं पर' हा आमिर खानचा या वर्षातील पहिला चित्रपट येईल. त्याच्यासमोर वरुण धवनचा 'बेबी जॉन' असेल. 'वेलकम टू द जंगल' हा मल्टिस्टारर चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने ख्रिसमसला बॉक्स ऑफिसवर तिरंगी सामना पाहायला मिळेल.

मराठी चित्रपटही मागे नाहीत...

'डंका हरिनामाचा' आणि '१२३४' हे मराठी चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार आहेत. त्यानंतर 'घरत गणपती' आणि 'गुगल आय' हे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट समोरासमोर उभे ठाकतील. अशोक सराफांचा 'लाइफलाईन' आणि अंकित मोहनचा 'बाबू' एकाच दिवशी येतील. त्यानंतर प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' येईल. याच दिवशी 'कैरी' हा चित्रपटही येणार आहे. सप्टेंबरमध्ये सचिन पिळगावकरांचा 'नवरा माझा नवसाचा २' प्रदर्शित होईल. नोव्हेंबरमध्ये सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चे वेध लागतील. 'पुष्पा २' आणि 'छावा'च्या रणधुमाळीत 'महापरिनिर्वाण' या मराठी चित्रपटाला संघर्ष करावा लागणार आहे.

टॅग्स :बॉलिवूड