२०१२ साली आलेला 'कॉकटेल' सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच आवडीचा. या सिनेमातील विषय, गाणी चांगलीच गाजली. 'तुमी हो बंधू' सारखं गाणं आजही प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये असेल यात शंका नाही. या सिनेमात सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारली. याशिवाय अभिनेत्री डायना पेन्टीने साकारलेल्या भूमिकेचंही कौतुक झालं. आता 'कॉकटेल' सिनेमाच्या सीक्वलची घोषणा झाली असून या सिनेमात सैफ ऐवजी अभिनेता शाहिद कपूर झळकणार असल्याची चर्चा आहे.
सैफऐवजी 'कॉकटेल 2' मध्ये झळकणार शाहिद?
पीपिंगमूनने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'कॉकटेल' सिनेमाच्या मेकर्सने आता 'कॉकटेल 2'साठी जोरदार तयारी सुरु केलीय. निर्मात्यांनी पहिल्या सिनेमाची स्टारकास्ट पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता सिनेमात सैफऐवजी शाहिद कपूर झळकणार असल्याची शक्यता आहे. शाहिदनेही 'कॉकटेल 2'मध्ये काम करण्यास उत्सुकता दाखवली आहे. याशिवाय आधीच्या सिनेमातील दीपिका-डायनाऐवजी 'कॉकटेल 2'मध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खान झळकण्याची शक्यता आहे.
'कॉकटेल 2' कधी होणार रिलीज?
शाहिदचा २०२४ मध्ये आलेल्या 'तेरी बातों में उलझा जिया' सिनेमानंतर तो पुन्हा एकदा 'कॉकटेल 2' निमित्ताने दिनेश विजान यांच्यासोबत काम करणार आहे. होमी अदजानिया 'कॉकटेल 2'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सध्या तरी सिनेमाच्या कथेवर काम सुरु आहे. सर्व काही फायनल झाल्यावर पुढील वर्षी २०२५ मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होऊन २०२६ ला सिनेमा रिलीज होईल.