अष्टपैलू अभिनेत्री शबाना आझमींचा आज वाढदिवस आहे. आज त्या 73 वर्षांच्या झाल्या. 1974 मध्ये अंकुर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शबाना यांनी अर्थ, थोडी सी बेवफाई, नमकीन, फायर, मकडी असे जबरदस्त चित्रपट बॉलिवूडला दिले. शबाना इतक्या प्रसिद्ध कलाकार आहेत, की त्यांच्या आयुष्याशी संबंधित किस्से पुन्हा-पुन्हा ऐकायला मिळतात. अशा या सुपरस्टार अभिनेत्रीने पेट्रोल पंपावर कॉफी विकली होती. तर एकदा आई ओरडली तर त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.
शौकत आझमी यांनी त्यांचं आत्मचरित्र असलेल्या कैफ अँड आय मेमॉयर या पुस्तकात शबाना आझमी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहलं की, एकदा मी शबानाला घरातून निघून जाण्यास सांगतिलं, त्यानंतर ती ग्रँट रोड स्टेशनच्या रुळांवर गेली. तेव्हा तिच्या शाळेचा चौकीदाराे तिला पाहिलं. तो ओरडला 'बेबी...बेबी तू काय करत आहेस' म्हणत त्याने शबानाला ओढले आणि शबाना वाचली.
आपल्या पुस्तकात शौकत आझमी यांनी आणखी एक प्रसंग लिहिला आहे. सिनियर केंब्रिजमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी शबाना यांनी पेट्रोल पंपावर ३ महिने कॉफी विकली. या कामासाठी शबाना यांना दररोज 30 रुपये मिळत होते. याबाबत त्याने आई-वडिलांना कधीच सांगितले नाही. एके दिवशी शबाना यांनी कमावलेले सर्व पैसे आईला दिले. त्यानंतर आईला याची माहिती मिळाली.
शबाना आझमी यांना 5 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 1975 मध्ये अंकुर, 1983 मध्ये अर्थ, 1984 मध्ये खंडहार, 1985 मध्ये पार आणि 1999 मध्ये गॉडमदर या चित्रपटांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. जवळपास l160 चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या शबाना यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान अलीकडेच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात शबाना आझमी झळकल्या आहेत. यात त्यांचा 87 वर्षीय धर्मेंद्रसोबतचा किस सीन चर्चेत आहे.