Join us

‘कोल्ड प्ले’सोबतच मुंबईकरांवर 'या' रॉक बँडचीही मोहिनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2016 2:43 PM

ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल इंडियामध्ये आकर्षणाचे केंद्र कोल्ड प्ले होते. लोकमत मीडिया पार्टनर असलेल्या या कार्यक्रमासाठी जमा झालेल्या तरुणाईला मात्र ...

ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल इंडियामध्ये आकर्षणाचे केंद्र कोल्ड प्ले होते. लोकमत मीडिया पार्टनर असलेल्या या कार्यक्रमासाठी जमा झालेल्या तरुणाईला मात्र कोल्ड प्लेसोबतच इतर आंतरराष्ट्रीय रॉक स्टार आणि रॉक बँडचा आनंद लुटता आला. सगळ्यात आधी व्यासपीठावर आगमन झाले ते आंतरराष्ट्रीय पॉप गायक डेमी लोवोटो हिचे. बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट हिने उपस्थितांना डेमीची ओळख करुन दिली.रॉकिंग अंदाज आणि आपल्या सौंदर्यानं घायाळ करणा-या डेमी लोवोटोच्या सूरांमध्ये तिच जादू असल्याचं रसिकांनी अनुभवलं. 20 मिनिटांच्या आपल्या परफॉर्मन्समध्ये डेमीने ‘कॉन्फिडन्ट’, ‘हार्ट अटॅक’, ‘फॉर यू’ आणि ‘स्टोन कोल्ड’ या एकाहून एक गाण्यांनी तरुणाईवर जादू केली. तरुणाई या गाण्यावर बेधुंद झालेली असतानाच डेमीच्या परफॉर्मन्सचा शेवट ''कोल्ड फॉर समर'' या गाण्याने झाला.डेमीप्रमाणेच ब्रिटीश रॉक बँड 'द वॅम्प'नेसुद्धा 20 मिनिटांत स्टेज ऑन फायर या उक्तीला सार्थ ठरवत धमाकेदार परफॉमन्स दिला. द वॅम्प बँडने ब्रेकिंग माय हार्टमधील ‘ओह सिसीलिया’ गाण्यास सुरुवात करताच उपस्थित तरुणाईच्या ओठावरसुद्धा ते सूर आपसुक रुळू लागले. बघता बघता हजारो तरुणाई ओह सिसिलीयाच्या रंगात रंगून गेली. यानंतर ‘कॅन व्ही डान्स’ या गाण्यासोबतच स्टेजवर ना-ना हरकती करत द वॅम्पने उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून 'जे झेडची' चर्चा तितकी झाली नव्हती. मात्र स्टेजवर येताच जे झेडने असे काही दमदार परफॉर्मन्स दिले की सारेच म्हणू लागले की तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकले. ए. आर. रेहमान आणि पंजाबी एमसीसोबत जे झेडची जुगलबंदी यावेळी रसिकांनी अनुभवली.एकीकडे ''छैय्या छैय्या'' आणि ''मुंडियाँ तू बचके'' ही गाणी तर दुसरीकडे जे झेडच्या ‘बाऊन्स’ या रॅपचे सूर अशी अनोखी जुगलबंदी रंगली. ड्रंक इन लव्ह, एम्पायर स्टेट ऑफ माइंड या जे झेडच्या सूरांमध्ये उपस्थितांनीही सूरात सूर मिसळला. मोबाईल फ्लॅशलाइट लाऊन तरुणाईने जे झेडला मनमुराद दाद दिली. त्याच्या 99 प्रॉब्लेम्स, होली ग्रेल, बिग पिम्पिन या गाण्यांनीही सा-यांना वेड लावलं.