करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने रसिकांच्या आवडी- निवडीही बदलतात. तोच तो पणा आला की त्या कलाकाराचे महत्त्वही कमी होवू लागते असेच काहीसे कॉमेडीयन राजू श्रीवास्तवसह झाले आहे.
एकेकाळी सिनेमा, स्टेज शो करत आपल्या विनोदाने हसवणारा राजू श्रीवास्तवला आता काम मिळणेही बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून त्याच्याकडे कामाच्या ऑफर्सही नाहीत. याला कारण म्हणजे झपाट्याने टेलिव्हिजन म्हणा किंवा मग वेळेनुसार काही तरी वेगळेपण, नाविन्य कामात नसल्यामुळे इतरांना संधी मिळत जातात असेच काहीसे सध्या राजू श्रीवास्तवसह घडले आहे.
तसेच काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहीले आहे. या लिहिलेल्या पत्रात राजू श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीच्या आजारामुळे चित्रपट व दूरदर्शन उद्योग जवळजवळ सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याच्याशी संबंधित लोक आर्थिक संकट आणि उपासमारीच्या मार्गावर आले आहेत. कलाकारांना स्वत: ची आणि कुटुंबाची काळजी घेणे आजकाल अवघड होत आहे. त्यांच्याकडे कमाईचे साधन नाही. चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन उद्योगाशी संबंधित लोकांना आर्थिक मदतीचा विचार करता संबंधित विभागाला निर्देश देण्याची विनंती राजू यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
मालिका सिनेमांच्या शूटिंग सुरू झाले असले तरीही सगळ्यानाच काम मिळाले असे नाही. ज्यांच्या हातात काम आहेत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब नक्कीच नसेल मात्र ज्यांच्याकडे कामच नाही. घरीच बसावे लागत आहे. त्यांच्याकडे दुसरे कोणतेच कमाईचे साधन नाही अशा कलाकारांनी काय करावे हा मोठा चिंतेचा प्रश्न सध्या भेडसावत असल्याचे त्याने म्हटले आहे.
२००९ पर्यंत राजू श्रीवास्तव यांची लोकप्रियताही अधिक होती. त्यामूळे त्यांना 'बिग बॉस'मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी 'बिग बॉसमध्ये भाग घेतला. तिथेही त्यांनी आपल्या अंदाजात रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. २०१३ मध्ये एका सिनेनिर्मात्यासह खटके उडाले आणि त्यांनी निर्मात्यावर केस केली होती. ते म्हणाले की, सिनेमाच्या निर्मात्यांनी मला न विचारता माझे पात्र या सिनेमात कॉपी केले आहे. हा सिनेमा होता 'डबल धमाल'.या सिनेमात सतीश कौशिक यांनी बाबाची भुमिका निभावली होती. राजू श्रीवास्तवचे म्हणे होते की, 'हे पात्र मी माझ्या अनेक शोमध्ये निभावले होते. त्यामुळे हे पात्र कॉपी करण्यात आले आहे.' पण या गोष्टीकडे सिनेमाच्या निर्मात्यांनी दुर्लक्ष केले.