Join us  

'अभिनेत्यांच्या तुलनेत आम्हाला...', बॉलिवूडमधील पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 4:23 PM

Priyanka Chopra : बॉलिवूडमधील पुरुष कलाकारांच्या वर्चस्वावर प्रियांका चोप्रानं आपलं मत मांडलं आहे.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा( Priyanka Chopra)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर देशातच नाही तर परदेशातही आपली ओळख निर्माण केली आहे. बऱ्याचदा ती विविध मुद्द्यांवर आपले मत ठामपणे मांडताना दिसते. ती कधी वर्णभेदावर तर कधी सामाजिक प्रश्नांवरही आपले मत मांडताना दिसली आहे. यावेळी तिने बॉलिवूडमधील पुरुष कलाकारांचे वर्चस्वाबाबत खुलासा केला आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत पुरुष कलाकारांची चलती असल्याचं मत तिने मांडले आहे. सर्व निर्णयदेखील तेच घेत असल्याचंही सांगितलं.

बॉलिवूडमधील पुरुष कलाकारांच्या वर्चस्वावर प्रियांका चोप्रा उघडपणे बोलली आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, मी हिंदी चित्रपटसृष्टीत माझ्या कारकिर्दीत खूप मोठा पल्ला गाठला आहे, जिथे पुरुषांच्या तुलनेत आमच्याकडे नेहमीच तुच्छतेने पाहिले जाते. इथे नायक ठरवतात चित्रपटाचे चित्रीकरण कुठे होणार? कोणाला कास्ट करायचं? आणि बरेच काही. आता कंटाळा आला आहे. आपण आता अशा काळात जगत आहोत जिथे महिलांना त्यांचे म्हणणे मांडता येणे आवश्यक आहे.

ती म्हणाली की, फरहान अख्तरच्या आधी मी माझ्या मैत्रिणी आलिया भट आणि कतरिना कैफला फोन केला होता. आम्ही म्हणालो, महिलांच्या अटींवर चित्रपट का बनवू नये. मग आम्ही मिळून 'जी ले जरा' हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात तीन मैत्रिणींची कथा असेल.

फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा मागील वर्षी ऑगस्टमध्ये झाली होती. महामारीमुळे चित्रपटाचे शूटिंग होऊ शकले नाही. यानंतर चित्रपटातील तीन मुख्य पात्र अभिनेत्री आलिया भट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि इतर प्रोजेक्टमध्ये काही बदलांमुळे व्यस्त झाल्या. चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपेल अशी आशा आहे.

 

टॅग्स :प्रियंका चोप्रा