अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ अडचणीत, निर्माता व कलाकारांविरोधात जैसलमेरमध्ये तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 03:25 PM2021-01-31T15:25:06+5:302021-01-31T15:26:03+5:30
जाणून घ्या काय आहे भानगड?
अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या सिनेमावरून झालेला वाद तुम्हाला आठवत असेलच. प्रदर्शनाआधी या सिनेमावरून मोठा वाद झाला होता. आता अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. होय, ‘बच्चन पांडे’ या अक्षयच्या आगामी सिनेमाचे कलाकार व मेकर्सविरोधात जैसलमेर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, जैसलमेरच्या भास्कर मोहल्ला येथे राहणारे आदित्य शर्मा यांनी आपल्या वकीलामार्फत मुख्य न्यायदंडाधिका-यांसमक्ष तक्रार दाखल केली आहे. ‘बच्चन पांडे’च्या शूटींगवेळी कोरोना गाईडलाइन्सचे पालन न केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सरकारच्या निर्देशानुसार, सध्या केवळ 100 लोकांना एकत्र होण्याची परवानगी आहे. मात्र ‘बच्चन पांडे’च्या शूटींगवेळी 200 लोकांची गर्दी होती. चित्रपटात जैसलमेरला उत्तर प्रदेशातील एक शहर म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे जैसलमेरचे पर्यटन व्यवसाय प्रभावित होण्याची शक्यता तक्रारीत वर्तवण्यात आली आहे.
तक्रारकर्त्याने अक्षय कुमार, क्रिती सॅनन, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
‘बच्चन पांडे’ या सिनेमात अभिमन्यू सिंग याची खलनायकाची भूमिका साकारणार आहे.फरहाद-सामजी या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. 26 जानेवारी 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तूर्तास त्याच्याकडे अनेक सिनेमे आहेत. येत्या काळात त्याचे बरेच चित्रपट रिलीज होणार आहेत. यात सुर्यवंशीपासून राम सेतू, रक्षा बंधन, बेलबॉटम, पृथ्वीराज चौहान, अतरंगी रे आणि बच्चन पांडे या चित्रपटांचा समावेश आहे.