शिल्पा शेट्टी व राज कुंद्राविरोधात फसवणुकीची तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:13 AM2020-03-06T10:13:32+5:302020-03-06T10:13:32+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी तूर्तास तरी कमी होण्याची चिन्हे नाहीत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी तूर्तास तरी कमी होण्याची चिन्हे नाहीत. होय, अभिनेत्री पूनम पांडे प्रकरणातून राज कुंद्रा बाहेर पडण्याआधीच आता फसवणुकीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. शिल्पा व राज दोघांवरही सोने योजनेत फसवणुक केल्याचे आरोप लगावण्यात आले आहेत. याप्रकरणी गुरुवारी खार पोलिस ठाण्यात एनआरआय बिझनेसमॅन सचिन जोशी यांनी तक्रार नोंदवली आहे.
Mumbai Police: A complaint has been filed against actor Shilpa Shetty and her husband&businessman Raj Kundra by an Non-Resident Indian (NRI) businessman, in a fraud case. pic.twitter.com/QaH1oZN3OW
— ANI (@ANI) March 5, 2020
काय आहे प्रकरण
सत्युग गोल्ड या खाजगी कंपनीच्या संचालकपदी शिल्पा आणि राज हे नियुक्त असताना सचिन जोशी यांनी 2014 मध्ये या कंपनीत 18 लाख 58 हजार रुपये किंमतीचे 1 किलो सोने विकत घेऊन गुंतवणूक केली होती. यावर पाच वर्षांनी परतावा मिळणार असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काही दिवसानंतर ही कंपनी बंद झाली आणि ऑफिसला सुद्धा टाळं ठोकण्यात आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सचिन जोशी यांनी शिल्पा आणि राज यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.
सचिन जोशी यांच्या तक्रारीनुसार, सत्युग गोल्ड कंपनीने पाच वर्षात परतावा मिळणार असे आश्वासन दिले होते. 25 मार्च 2019 मध्ये त्यांची योजना समाप्त झाली तरी परतावा मिळाला नाही. कंपनीचे वांद्रतील बीकेसीतील कार्यालय बंद झाल्याचेही सचिन जोशी यांना आढळून आले. दुसरीकडे शिल्पा शेट्टी, कुंद्रा यांनी या कंपनीच्या संचालकपदावरुन मे 2016 आणि नोव्हेंबर 2017 मध्ये राजीनामा दिल्याचेही त्यांना आढळले.
पूनम पांडेनेही केली होती तक्रार
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूनम पांडेने राज कुंद्राविरोधात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. राज कुंद्राने पूनम पांडेसोबत एका कंपनीत पैसे गुंतवले होते. अॅप तयार करत असलेल्या या कंपनीतून मिळालेला नफा दोघे ५०-५० टक्के वाटून घेणार होते. परंतु काही काळानंतर राजने तिच्या हिस्स्याचे पैसे देण्यास नकार दिला. शिवाय दोघांमध्ये असा कुठलाच करार झाला नसल्याचे तो सांगू लागला, असा पूनमने आरोप केला होता.