Confirm : २५ जानेवारीलाच प्रदर्शित होणार ‘पद्मावत’, निर्मात्यांनी केली घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 2:58 PM
प्रचंड वादानंतर ‘पद्मावत’ २५ जानेवारी रोजीच रिलीज होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निर्मात्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
प्रचंड वादानंतर शाहिद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा ‘पद्मावत’ हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पद्मावत’चे पोस्टर्स रिलीज करून याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता २५ जानेवारी रोजीच रिलीज होणार आहे. त्याचबरोबर निर्मात्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली असून, ‘पद्मावत’ हा पहिला भारतीय चित्रपट असेल जो जगभरात आयमॅक्स ३डीमध्ये रिलीज होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सेन्सॉर बोर्डाच्या एका विशेष पॅनलने ‘पद्मावत’चे समीक्षण करून रिलीजसाठी हिरवा झेंडा दाखविला होता. असे करत असतानाच सेन्सॉरने निर्मात्यांना चित्रपटात पाच मोठे बदल करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हा चित्रपट अगोदर १ डिसेंबर रोजी रिलीज करायचा होता. परंतु राजपूत समाज संघटनांकडून चित्रपटाला प्रचंड विरोध झाल्याने रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. मात्र राजपूत संघटनांचा विरोध पाहता चित्रपट केव्हा रिलीज होईल हे सांगणे खूपच मुश्कील होते. अखेर २५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. अर्थात याकरिता सेन्सॉर बोर्डाला स्वतंत्र समिती गठित करावी लागली. या समितीच्या समीक्षणानंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्माते हा चित्रपट तेलगू, तामीळ आणि हिंदी भाषेत रिलीज करणार आहेत. दरम्यान, ‘पद्मावत’विषयी दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी सांगितले की, ‘पद्मावत’चे रिलीज होणे माझे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. मी नेहमीच राजपूत यौद्धांविषयी प्रेरित आणि प्रभावित झालो आहे. या यौद्ध्यांच्या कथा अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. माझा हा चित्रपट राजपूतांचा तोच गौरवशाली इतिहास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. मी सर्व इंडस्ट्रीचे आभार मानतो की, त्यांनी माझ्या कठीण काळात मला साथ दिली.