बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'अॅनिमल' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. दुसरीकडे मात्र या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अभिनेत्री कंगना रणौतने सिनेमावर निशाणा साधला आहे.
नुकतेच एका युजरने ट्विटवर X वर कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाचं कौतुक केलं. तसेच त्याने ‘तेजस’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई का करु शकला असाही प्रश्न उपस्थित केला. यावर कंगनाने रिट्विट करत रणबीरच्या अॅनिमलवर निशाणा साधला आहे. तिने लिहलं, 'माझ्या चित्रपटांबाबत मोठ्या प्रमाणात नकारात्मकता पसरवली जाते. मी आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे'.
पुढे तिने लिहलं, 'पण प्रेक्षकांना असेच चित्रपट आवडतात, ज्यात महिलांना मारहाण आणि एखाद्या वस्तूसारखे वागवले जाते, बूट चाटण्यास सांगितले जाते. जे पुरुष एका स्त्रीला आपले जीवन समर्पित करतात अशा व्यक्तींसाठी असले चित्रपट पाहणे अत्यंत निराशाजनक आहे. मला माझ्या आयुष्यातील सर्वात्तम वर्ष हे काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यात घालवायची आहेत'.
भरपूर टीका होत असली तरी 'अॅनिमल' सिनेमानं 'टायगर 3','गदर 2' आणि 'पठाण'चेही रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. सिनेमाचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण 26 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो.