अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा इटलीत १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. या लग्नाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. पारंपरिक कोंकणी आणि सिंधी विवाह पद्धतीत लग्न पार पडले. मात्र दीपवीरच्या आनंद कारज विवाहावर शीख समुदायाने आक्षेप घेतला आहे.
इटलीतील लेक कोमो परिसरात रणवीर दीपिकाचा विवाहसोहळा पार पडला. १४ तारखेला कोंकणी पद्धतीने तर १५ तारखेला आनंद कारज पद्धतीने लग्नाचे विधी पार पडले. आनंद कारज या विवाह पद्धतीनुसार रणवीर- दीपिकाला गुरुद्वारामध्ये जाणे भाग होते. पण त्यांनी तसे न करता विवाहस्थळी गुरु ग्रंथ साहिब आणले. शीख धर्मीयांकडून पवित्र मानले जाणारे गुरु ग्रंथ साहिब गुरुद्वाराबाहेर नेले जात नाही. त्यामुळे शीख समुदाय नाराज झाला असून त्यांनी याची तक्रार अकाल तख्तकडे केली आहे. यावर आता दीपिका- रणवीर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. होय, येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असणार आहे.