Join us

बाप म्हणून भीक मागतो...; वानखेडे-शाहरुखचे चॅट उघड संवादाची प्रत वानखेडेंकडून कोर्टात सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 6:42 AM

आर्यनवर कारवाई होऊ नये यासाठी शाहरुखने वानखेडे यांच्याकडे गयावया केली. एक बाप म्हणून आपणाकडे भीक मागत असल्याचे त्याने चॅटिंगमध्ये नमूद केले आहे.

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवर ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेतले. मात्र, आर्यनला यात गोवण्यात येऊ नये यासाठी एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आर्यनचे वडील सुपरस्टार शाहरुख खान याच्याकडून २५ कोटींची मागणी केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून, या दरम्यान शाहरुखशी झालेल्या संवादाची प्रत सोबत जोडली आहे. आर्यनवर कारवाई होऊ नये यासाठी शाहरुखने वानखेडे यांच्याकडे गयावया केली. एक बाप म्हणून आपणाकडे भीक मागत असल्याचे त्याने चॅटिंगमध्ये नमूद केले आहे.

दाेघांमध्ये काय झाले संभाषण?  - शाहरुख : मी खात्री देतो की, माझा लेक आर्यनला असा माणूस बनविण्याचा प्रयत्न करेन की, ज्याचा तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल. ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. तुम्ही आणि मी आपली जबाबदारी पार पाडली आहे. आपण मला सहकार्य केले, त्याबद्दल आभारी.    - वानखेडे : माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत...- शाहरुख : आपण खूप छान व्यक्ती आहात. प्लीज माझा लेक आर्यनवर दया दाखवा. मी तुम्हाला विनवणी करतो... कृपया त्याला तुरुंगात राहू देऊ नका. तो माणूस म्हणून मोडेल. कायद्याचा अधिकारी म्हणून तुमची सचोटी न गमावता, कृपया तुम्ही शक्य असेल, त्या पद्धतीने मदत करू शकता. मी सदैव तुमचा ऋणी राहीन. 

त्यानंतर शाहरुख याने वानखेडे यांना वैयक्तिकपणे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर वानखेडे यांनी हे संपल्यावर लवकरच भेटू, असे उत्तर शाहरुखला दिले. शाहरुखने त्यानंतरही वानखेडे यांना अनेक मेसेज केले.   

आर्यनशी सौम्यपणे वागा - तुमच्या लोकांना त्याच्याशी सौम्यपणे वागण्यास सांगा. माझे हृदय तोडू नको. ही एका बापाची दुसऱ्या बापाला विनवणी आहे. - तुम्ही जसे तुमच्या मुलांवर प्रेम करता, तसे मीही माझ्या मुलांवर प्रेम करतो. मी दयाळू आणि  सभ्य गृहस्थ आहे. - समीर, माझा तुमच्यावरचा आणि यंत्रणेवरचा विश्वास तोडू देऊ नका. आम्ही कुटुंब म्हणून उद्ध्वस्त होऊ. - माझ्यावर आणि कुटुंबावर दया करा. मी तुमच्यासमोर भीक मागत आहे. 

टॅग्स :शाहरुख खानसमीर वानखेडेआर्यन खानन्यायालय