कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना मदतीचे अनेक हातही पुढे येत आहेत. अदृश्य शत्रूची लढणाना देशातील लहान-थोर सगळेच मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या दानशूरतेचे दर्शन घडवत, मदत दिली आहे. आता अभिनेता सोनू सूद याने मुंबईच्या जुहूस्थित आपले हॉटेल डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचा-यांसाठी खुले केले आहे.
देशातील डॉक्टर्स, नर्स आणि संबंधित सर्व आरोग्य कर्मचारी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढत आहेत. अशास्थितीत या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. सोनूने नेमके हेच केले.एक अधिकृत निवेदन जारी करत त्याने त्याचे जुहूतील हॉटेल मेडिकल स्टाफसाठी खुले केले़. ‘लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र खपत असलेले आपले डॉक्टर्स, नर्स आणि पॅरा मेडिकल स्टाफसाठी असे थोडेबहुत जरी मी करू शकलो तरी माझ्यासाठी ती सन्मानाची गोष्ट असेल. या रिअल हिरोंसाठी माझे हॉटेल खुले करून मला मनापासून आनंद होतोय,’असे त्याने म्हटले आहे.
आत्तापर्यंत अनेक बॉलिवूडकरांनी सरकारला मदतीचा हात दिला आहे. अक्षय कुमार, सलमान खान, आमीर खान, रजनीकांत, कपिल शर्मा अशा अनेकांनी आपल्यापरीने मदत केली आहे. कमल हासन, सोनू निगम यासारख्या काहींनी कोरोना संकटात आपले घर देऊ केले आहे. कमल हासन यांनी तर माझ्या घराचे रूग्णालयात रूपांतर करा, अशी सांगत कोरोना रूग्णांना मदतीचा हात देऊ केला आहे.
तूर्तास देशात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोना रूग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. रूग्णांसाठी जागा कमी पडू नये म्हणून रेल्वे डब्यांचे रूग्णालयात रूपांतर केले जात आहे.