मागील वर्षी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांच्या कुटुंबातील ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. प्रदीर्घ उपचारानंतर ते बरे झाले होते, तर आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने त्यांच्या घरी शिरकाव केला आहे. त्याच्या बंगल्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
यापूर्वी, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की ते त्यांच्या घरी कोविड-१९ संबंधित परिस्थिती हाताळत आहेत आणि थोड्या वेळाने त्यांच्या चाहत्यांशी संपर्क साधतील. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नियमित तपासणीदरम्यान बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' आणि 'जलसा' बंगल्यातील ३१ कर्मचाऱ्यांपैकी एकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
कर्मचारी कोविड केअर सेंटर-२ मध्ये आहे क्वारंटाईन
ते म्हणाले की, 'तो कर्मचारी बीएमसीच्या कोविड केअर सेंटर-२ मध्ये क्वारंटाईन आहे.' त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्याला संसर्गाची कोणतीही लक्षणे नाहीत. आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केले, ज्यात संक्रमित लोकांच्या संपर्कात असलेल्या लोकांची ओळख पटवणे, त्यांची चाचणी घेणे आणि भूतकाळात संक्रमित व्यक्तींच्या अगदी जवळ असलेल्या लोकांसाठी घरी राहणे यांचा समावेश आहे.
चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
अमिताभ बच्चन नियमितपणे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टी ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांनी काल ब्लॉगमध्ये फक्त एक ओळ लिहिली होती की, 'घरी कोविड-१९ संबंधित परिस्थिती हाताळत आहेत आणि थोड्या वेळाने चाहत्यांशी संपर्क साधतील.' या ब्लॉगवर कमेंटमध्ये अनेक चाहत्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.