बॉलिवूडची सुप्रसिद्ध सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली. तिची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येताच अनेकांनी धसका घेतला होता. कारण कनिका अनेकांच्या संपर्कात आली होती. काही पार्ट्यांना तिने हजेरी लावली होती. खरे तर लंडनमधून परतल्यावर कनिकाने सेल्फ आयसोलेशनमध्ये जाणे अपेक्षित होते. पण याऊलट कनिकाने काही पार्ट्यांना हजेरी लावली. या कमालीच्या निष्काळजीपणाबद्दल कनिका प्रचंड ट्रोल झाली. इतकेच नाही तर याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. आता कनिकाबद्दल आणखी एक बातमी आहे. होय, कनिकाला सध्या लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पण इथे तिच्या नख-यांमुळे रूग्णालयाचा अख्खा स्टाफ वैतागला आहे.
संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डायरेक्टर जनरल आर. के. धीमान यांनी कनिकावर आरोप केले आहेत. कनिका उपचाराला सहकार्य करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, कनिकाला हॉस्पिटलच्या किचनमधून ग्लुटेन फ्री जेवण दिले जात आहे. उत्तम सुविधा पुरवली जात आहे. अटॅच्ड टॉयलेटसोबत आयसोलेशन रूममध्ये तिला ठेवण्यात आले आहे. तिच्या रूममध्ये पेशंट बेडसोबत टीव्हीही आहे. याशिवाय तिची खोली एअर कंडिशन्ड आहे़ यात कोविड-19 युनिटनुसार एअर हँडलिंग युनिटही आहे. तिची चांगली काळजी घेतली जात आहे. पण याऊपरही तिच्याकडून सहकार्य मिळत नाहीये. ती रूग्णासारखी नाही तर स्टारसारखी वागतेय.
यापूर्वी कनिकानेही हॉस्पीटलवर आरोप केले होते. तू खूप मोठी चूक केली. तपासणी न करता पळून गेलीस, अशी धमकी मला डॉक्टर्स देत आहेत. येथे खाण्या-पिण्याला काहीही नाही़ पाणी नाही. मी त्रासली आहे, असे तिने म्हटले होते.