कोरोना व्हायरसने अख्ख्या जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसतोय. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय. हा आकडा चिंता वाढवणारा असला तरी राज्य सरकार अगदी खंबीरपणे आणि अतिशय संयमाने स्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. अनेक पातळ्यांवर लढत आहेत. ते ज्या पद्धतीने स्थिती हाताळत आहेत, ते पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही उद्धव ठाकरे यांचे जाहीर कौतुक करत, त्यांना कडक सॅल्युट ठोकला आहे.
‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.जावेद अख्तर त्यांच्या परखडपणासाठी ओळखले जातात. अगदी अलीकडे त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मशिदींमध्ये नमाज पठण सुरु असल्यावरून टीका केली होती. काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन करत आहेत. तरीही, लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहे.
काही मुस्लीम समाजातील लोक एकत्र येऊन नमाजपठण करत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर गीतकार जावेद अख्तर यांनी देशातील मशिदी बंद करण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. कोरोनाचे संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात या मागणीचे मी समर्थन करतो. काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील का नाही, असे ट्विट त्यांनी केले होते.