बॉलिवूडची बेबी डॉल गायिका कनिका कपूर ही अलीकडे कोराना पॉझिटीव्ह आढळली. कनिकाला कोरोना झाल्याचे कळताच बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. इतकेच नाही तर कनिका स्वत:ही यामुळे चर्चेत आली. याचे कारण म्हणजे, लंडनमधून परतल्यानंतरही कनिका काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली. स्वत:सोबत तिने इतरांचाही जीव धोक्यात घातला. लंडनवरून परतल्यानंतर विमानतळावर तिने स्क्रिनिंग केले नव्हते, असेही म्हटले गेले. अर्थात कनिकाने हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. सध्या कनिकावर उपचार सुरु आहेत. याचदरम्यान कनिकाची एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होतोय. यात कनिका तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना दिसतेय.
उण्यापु-या वयाच्या 17 व्या वर्षी कनिकाने लग्न केले. होय, एनआरआय राज चंदोकसोबत लग्न करून कनिका लंडनला गेली. तिला तीन मुलं झालीत. पण पुढे संसारात कुरबुरी वाढल्या आणि कनिकाने 2012 मध्ये पतीसोबत घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर ती भारतात परतली. पण हा काळ तिच्यासाठी प्रचंड खडतर होता. कनिकाने याच काळाबद्दल मुलाखतीत सांगितले होते.
‘त्या दिवसांत माझ्या मनात कायम आत्महत्येचे विचार यायचे. तुमच्याकडे पैसे नसले की, असे विचार मनात येतात. माझ्याकडे पैसे नव्हते. वकीलांना द्यायलाही पैसे नव्हते. माझ्या मुलांना शाळेतून काढले होते. कारण त्यांच्या शाळेची फी द्यायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. पण अशास्थितीत देवाने मला बेबी डॉल गाण्याची संधी दिली आणि या एका संधीने माझे आयुष्य बदलले,’ असे कनिकाने मुलाखतीत सांगितले होते.
कनिकाचा पहिले गाणे ‘जुगनी जी’ 2012 मध्ये रिलीज झाले. हे गाणे जबरदस्त लोकप्रिय झाले. पण तिच्या करिअरला ‘बेबी डॉल’ या गाण्याने एका नव्या उंचीवर नेले. या गाण्यामुळे कनिकाला बॉलिवूडची मोठी प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखले जाऊ लागले. ती एका रात्रीत स्टार झाली.‘रागिनी एमएमएस 2’चे बेबी डॉल हे गाणे सनी लिओनीवर चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे तुफान व्हायरल झाले होते. या गाण्यासाठी कनिकाला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या यशानंतर कनिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही.