संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरविरूद्ध लढाई लढत आहेत. प्रत्येक जण या लढाईत उतरले असताना समाजातील काही दानशूरांनी सरकारला मदतीचा हात देऊ केला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सरकारला आपआपल्या परीने मदत केली. आता शाहरूखने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. होय, याआधी शाहरूखने पीएम व सीएम फंडाला त्याने मदत केली. शिवाय साडेपाच हजार लोकांना जेवण, अडीच हजार लोकांना किराणा पुरवला. आता किंगखानने आरोग्य टीमला लाख मोलाची मदत दिली आहे. होय, शाहरूखने आरोग्य सेवेतील कर्मचा-यांसाठी तब्बल 25 हजार पीपीई किट्सचे वाटप केले आहे.
कोरोना रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस यांच्यासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पीपीईची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे. कारण डॉक्टर, नर्सेस आपला जीव धोक्यात घालून कोरोना रूग्णांवर उपचार करत आहेत. अशास्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी शाहरूखने हे पीपीई किट्स वाटले.
आरोग्यमंत्र्यांनी मानले आभारशाहरूख खानच्या या मदतीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून त्याचे आभार मानले आहेत. ‘शाहरूख खान यांनी 25 हजार पीपीई किट्स देऊन मदतीचा हात दिला. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो. यामुळे कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आमची मदत होईल आणि आरोग्य कर्मचा-यांची सुरक्षा साध्य होईल,’ असे टोपे यांनी लिहिले.
शाहरूखने दिले उत्तरआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आभाराच्या ट्विटला शाहरूखनेही उत्तर दिले. ‘मानवजातीच्या सुरक्षेसाठी आपण सर्व एकत्र येऊन लढुयात. तुमची मदत हे माझे कर्तव्य आहे. तुमची टीम आणि कुटुंब सुद्धा सुरक्षित राहू दे,’ असे ट्विट शाहरूखने केले.
आधी केली ही मदतशाहरूखने पीएम, सीएम फंडात मदत केली आहेच. याशिवाय शाहरूखचे मीर फाऊंडेशन एक महिन्यासाठी मुंबईतील सुमारे 5500 कुटुंबाना रोज भोजन पुरवत आहे. याशिवाय रूग्णालयातील 2000 जणांचे जेवण, दिल्लीतील 2500 कामगार व 100 अॅसिड हल्ल्यातील पीडितांना किराणा माल पुरवण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. याशिवाय वांद्रे येथील स्वत:ची चार मजली कार्यालयीन इमारत क्वारन्टाईनसाठी मुंबई पालिकेला दिली आहे.