कोरोना महामारीचा फटका सर्वांनाच बसला आहे. लाखो लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. अनेकांचे बळी गेले आहेत. तर अनेकांसमोर या महामारीने जगण्यामरण्यााचा प्रश्न उभा केला आहे. रोजंदारीवर काम करणारे लोक आणि गरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. निश्चितपणे समाजातील काही दानशूर व्यक्ती या लोकांच्या मदतीसाठी तत्पर आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्यापैकी एक. या संकटाच्या काळात आतापर्यंत अक्षयने अनेकपरीने मदत केली. आता त्याने सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनलाही 45 लाख रूपयांची मदत दिली आहे. सोबत काही पीपीई किट्स आणि मास्कचे वाटपही त्याने केले आहे.
सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे सीनिअर ज्वॉइंट सेक्रेटरी व अभिनेते अमित बहल यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊनमुळे शेकडो ज्युनिअर आर्टिस्ट आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही ही गोष्ट अक्षयच्या कानावर टाकली. अक्षयने त्वरित या ज्युनिअर आर्टिस्टची यादी मागितली आणि मदत करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याला 1500 लोकांची यादी दिली़ अक्षयने लगेच या प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार रूपये जमा केले. अशाप्रकारे त्याने एकूण 45 लाख रूपयांची मदत केली. एवढेच नाही यापुढेही मदतीची गरज पडल्यास सांगा, अशा शब्दांत त्याने आम्हाला आश्वस्त केल्याचे अमित बहल यांनी सांगितले.
कोरोना संकटकाळात अक्षय सातत्याने मदत करतोय. अगदी सुरुवातीला त्याने पीएम फंडात 25 कोटी रूपयांची मदत दिली. यानंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांच्या पीपीई आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेला तीन कोटी रुपयांची रक्कम दान केली. मुंबई पोलिसांनाही त्याने 2 कोटींची मदत केली. शिवाय मुंबई पोलिसांना 1000 सेन्सर बॅण्डही भेट म्हणून दिले़ या हेल्थ बॅण्डच्या मदतीने कोरोनाचा धोका आधीच लक्षात येतो.