कोरोना व्हायरसचे संकट पाहून बॉलिवूडचे कलाकार काहीना काही मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूखदेखील लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. शाहरूख खानने पीएम केअर फंडमध्ये डोनेट करण्यासोबतच आणखीन मोठ्या घोषणा केल्या. ज्यात मूलभूत गोष्टींसाठी वंचित असणाऱ्या लोकांच्या घरी एक महिने जेवण पोहचवले जाईल, अॅसिड अटॅक झालेल्या महिलांना स्टायपेंड दिले जाणार आहे आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. आता त्याच्या या घोषणेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी शाहरूखने घेतलेल्या या पुढाकारावर ट्विट केले आणि त्यावर किंग खानने देखील आभार मानत आपले मत व्यक्त केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, धन्यवाद शाहरूख खानजी. या कठीण समयी तुमचे हे उदार योगदान कित्येक लोकांच्या जीवनाला स्पर्श करणार आहे.
या अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटवर शाहरूखने प्रतिक्रिया दिली. शाहरूख म्हणाला की, सर, तुम्ही तर दिल्लीवाले आहात. धन्यवाद नका करू, आदेश द्या. आपल्या दिल्लीवाल्या भाऊ व बहिणींसाठी मी कार्यरत राहेन. देवाची इच्छा असेल तर या संकटावर आपण लवकर मात करून बाहेर पडू.
शाहरूख खानने पुढे लिहिले की, ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या तुमच्या टीमला देव खूप ताकद व शक्ती देओ. शाहरूखच्या या ट्विटवर खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
तसेच शाहरूखच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाहरूख खान व त्याची पत्नी गौरी खानचे आभार मानले. उद्धव ठाकरेंनी इंग्रजीमध्ये थँक्य यू म्हटलं पण शाहरूखने त्यांना मराठीमध्ये प्रतिक्रिया देऊन सर्वांना हैराण केले.
शाहरूख खानने ट्विट केले होते की, ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंबे तळे साचे. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल. आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद!
याशिवाय पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील शाखरूख खानच्या मदतीनंतर आभार मानले होते. त्यावेळी शाहरूखने त्यावर प्रतिक्रिया देत त्यांचे कौतूक करताना म्हटले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी ते खूप मेहनत करत आहेत. एवढंच नाही तर किंग खानने आदित्य ठाकरेंना रिकाम्या वेळेत कविता लिहायलाही सांगितले.शाहरूख खानने देशातील संकटाच्या काळात जनतेला मदत करून पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे आणि चाहत्यांचेही मन जिंकले आहे.