चीनमधील वटवाघळांमुळे कोरोना विषाणू जगभर पसरला, असे मानले जात आहे. त्यामुळे वटवाघळांचे नाव ऐकले तरी धडकी भरावी, अशी सध्या स्थिती आहे. एखादे वटवाघुळ तुमच्या घरात शिरले तर काय? याची कल्पनाही न केलेली बरी. अशात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरात एक वटवाघूळ शिरले आणि खुद्द महानायकाची भंबेरी उडाली.
होय, अमिताभ यांनी स्वत: ट्विटरवर याची माहिती दिली आहे. ‘देवियों और सज्जनों, या तासाची बातमी़ ब्रेकिंग न्यूज... एक वटवाघूळ जलसात तिस-या माळ्यावरील माझ्या खोलीत शिरले, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? कसेबसे त्याला बाहेर काढले. कोरोना पिच्छाच सोडत नाहीये,’ असे ट्विट अमिताभ यांनी केले.
काहींनी मात्र या ट्विटवरून अमिताभ यांना सल्लाही दिला. वटवाघळांमुळे कोरोना पसरत नाही, तेव्हा असे ट्विट करून गैरसमज पसरवू नको, असे अनेकांनी त्यांना सांगितले.एकंदर काय तर जलसामध्ये वटवाघूळ शिरल्याच्या निमित्ताने का होईना युजर्सचे काही वेळ मनोरंजन झाले.