Join us

कर्ज काढेन पण स्टाफला पगार देईन! याला म्हणतात रिअल हिरो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:10 PM

माझी तितकी ऐपत नाही. पण माझ्या स्टाफची मी सर्वोतोपरी काळजी घेईल...

ठळक मुद्देदीपक डोबरियालने तनु वेड्स मनु, अंग्रेजी मीडियम यासारख्या सिनेमातमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 

संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढतोय. संपूर्ण देश ठप्प आहे. व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक सगळे काही लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेय. हजारो लोकांना पोसणारी बॉलिवूड इंडस्ट्रीलाही याचा फटका बसला आहे. शूटींग बंद आहे, नव्या चित्रपटाचे रिलीज अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहे. साहजिकच बॉलिवूड इंडस्ट्रीतील रोजंदारीवर काम करणा-या शेकडो कामगार, कलाकारांच्या स्टाफमधील लोक यांच्यावर रोजीरोटीचे संकट ओढवले आहे. बॉलिवूडमधून अनेक लोक या सर्वांच्या मदतीला समोर आले आहेत. काही जण भक्कमपणे आपल्या स्टाफच्या पाठीशी उभे आहेत. बॉलिवूड अभिनेता दीपक डोबरियाल यापैकीच एक.

काहीही होवो, एकाही स्टाफ मेंबरचा पगार चुकवणार नाही, अगदी त्यासाठी कर्ज काढावे लागले तरी चालेल, असे दीपकने म्हटले आहे.हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत दीपकने ही भूमिका स्पष्ट केली. ‘कोरोना व्हायरस आणि यामुळे अपरिहार्य असलेले लॉकडाऊन यामुळे माझ्यासारख्या अनेकांना एवढा त्रास होत असेल तर महिन्याच्या पगारावर अवलंबून असलेले, रोजंदारीवर काम करणा-या काय अवस्था असेल, हे मी समजू शकतो. या लोकांसाठी हा किती कठीण काळ आहे, याची मला जाणीव आहे. माझ्या स्टाफमध्ये 6-7 लोक माम करतात. प्रत्येकजणावर वेगवेगळी जबाबदारी आहे. सध्या ते कामावर नाहीत. पण या सर्वांना मी हे सगळे संपेपर्यंत नियमित पगार देण्याचे वचन दिले आहे. मग यासाठी मला कर्ज घ्यावे लागले तरी चालेल. पण त्यांचे पगार मी थकू देणार नाही,’ असे दीपक यावेळी म्हणाला.

अन्य बॉलिवूडचे कलाकार करत आहेत, तितके कदाचित मी नाही करू शकणार. पण माझ्याने शक्य असेल ते सगळे मी करणार. एका वर्षात मी केवळ एक सिनेमा करतो. त्यामुळे माझी तितकी ऐपत नाही. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. पण माझ्या स्टाफची मी सर्वोतोपरी काळजी घेईल, असेही दीपक म्हणाला.

दीपक डोबरियालने तनु वेड्स मनु, अंग्रेजी मीडियम यासारख्या सिनेमातमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या दीपक उत्तराखंडात आपल्या कुटुंबासोबत अडकून पडला आहे. येथे तो एका सिनेमाचे शूटींग करत होता. अभिनेता मनोज वाजपेयी हाही त्याच्यासोबत अडकून पडला आहे. अलीकडे ‘इंग्रजी मीडियम’ या सिनेमात दीपक डोबरियाल दिसला होता.