कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. अनेक जण पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेकजण लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. आता या सेलिब्रेटींमध्ये विवेक ऑबरॉयचा समावेश झाला आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. पण यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांचे प्रचंड हाल होत आहेत. रोज कष्ट केल्याशिवाय खायला मिळत नाही अशी भारतीतील अनेकांची दयनीय अवस्था आहे. अतिशय बिकट परिस्थिती असलेल्या नऊ परिवारातील मजूरांना विवेक ऑबेरॉयने मदत करण्याचे ठरवले आहे. या परिवारांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था पुढील काही दिवस विवेककडून केली जाणार आहे.
विवेक ऑबेरॉयनेच सोशल मीडियाद्वारे या गोष्टीविषयी सांगितले आहे. त्याने एक ट्वीट करून त्यात लिहिले आहे की, ही वेळ एकमेकांना मदत करण्याची असून गरजूंच्या पाठिशी उभी राहाण्याची आहे. नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा जो लॉकडाऊन घोषित केला आहे. त्या लॉकडाऊन दरम्यान मी नऊ कुटुंबाची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. लोकांना देखील मी विनंती करतो की, तुम्ही देखील तुमच्यापरिने गरजू लोकांना मदत करावी.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.