चीनमधून जगभरात पसलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत बऱ्याच लोकांचा बळी गेला आहे. देशभरातही कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात सेलिब्रेटींमध्ये कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. त्यानंतर आता अभिनेता पुरब कोहलीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. इतकंच नाही तर त्याच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्याने इंस्टाग्रामवर दिली आहे. पुरब व त्याचे कुटुंबीय सध्या लंडनमध्ये राहत आहेत.
पुरब कोहलीने इंस्टाग्रामवर सांगितले की, आमच्यात नेहमीच्या तापाची व सर्दीची लक्षणे दिसली. श्वसनाचा त्रास जाणवला. डॉक्टरांनी आम्हाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. माझी मुलगी इनाया हिला पहिल्यांदा करोनाची लागण झाली. त्यानंतर पत्नी लुसी व मला ताप आला. चार-पाच दिवसांनी ताप कमी झाला पण सर्दी अजूनही तशीच होती. आम्ही सगळे क्वारंटाइनमध्ये होतो. बुधवारी आम्ही क्वारंटाइनमधून बाहेर आलो.
कोरोनापासून वाचण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी घरीच काही काळजी घेतली. त्याबद्दलही त्याने सांगितले की, आम्ही दिवसातून चार ते पाच वेळा वाफ घ्यायचो. मिठाच्या पाण्याने गुळण्या करायचो. आलं, हळद आणि मध यांचं मिश्रण करून घेतल्याने घसा खवखवणं कमी झालं. गरम पाण्याने आंघोळ करत होतो. याशिवाय दिवसभर आराम करत होतो. आता दोन आठवडे झाले आहेत. मात्र अजूनही आम्ही त्यातून ठीक होत आहोत असं वाटते आहे.