कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील ज्युनिअर आर्टिस्टवर उपासमारीची वेळ आली आहे. स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, प्रोडक्शनशी संबंधित लोकांची सध्या अतिशय भयानक स्थिती आहे. त्यांच्या घरात अन्न शिजवायला देखील नसल्याने त्यांना मदत करण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. आता अभिनेता सलमान खानने या लोकांसाठी एक मोठे काम केले आहे.
सलमान खानची बिईंग ह्युमन ही संस्था आता चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या २५ हजार लोकांची मदत करणार आहे. सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. सलमान खानने इंडस्ट्रीच्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजला फोन करून २५ हजार कामगारांचे बँक डिलेल्स मागवले आहेत. यापूर्वी करण जोहर, आयुष्यमान खुराना, कियारा अडवाणी, तापसी पन्नू, सिद्धार्थ मल्होत्रा, नितेश तिवारी हे देखील कामगारांच्या मदतीसाठी पुढे आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईज आणि गिल्ड प्रोड्यूसर असोसिएशनने मिळून या लोकांना दैनंदिन वापरात लागणारे अत्यावश्यक धान्याचे वाटप केले होते. 5000 कर्मचाऱ्यांना गोरेगावमधील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये धान्याचे वाटप करण्यात आले होते. प्रोड्यसुर गिल्ड ऑफ इंडियाने देखील कामगारांना काही आर्थिक मदत केली आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे.