जगभरात कोरोना व्हायरसने थैमान माजवला आहे. त्यात आता भारतातही कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढताना दिसतो आहे. आतापर्यंत बऱ्याच लोकांचा बळी गेला आहे तर आतापर्यंत कित्येक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्हायरसचा नायनाट करण्यासाठी सरकार, प्रशासन, डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र झटत आहेत. त्यात काही सेलिब्रेटी घरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे. तसेच काही सेलिब्रेटींनी आर्थिक मदतनिधीदेखील दिला आहे. दरम्यान अभिनेता सलमान खान याने मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान यानं 25 हजार कामगारांना आर्थिक साहाय्य केले होते. आता तो रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांसाठी पुढे सरसावला आहे. हातावरचे पोट असणाऱ्या जवळपास 50 महिलांना सलमान खान याने मदत केली आहे.इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी मालेगावमधून काही जणांशी संपर्क केला होता. त्यानुसार या 50 महिलांना आर्थिक सहकार्याची गरज असल्याचे सलमानला कळवण्यात आले होते. सलमान खानच्या टीमने या फोनमागील सत्यता पडताळून पाहिली आणि त्यांची समस्या खरी असल्याने त्याची टीम या महिलांपर्यंत पोहोचली. त्यांनी या महिलांना जेवण आणि गरजेच्या गोष्टी दिल्या आहेत.
सलमान खानचा मॅनेजर जॉर्डी पटेलने या बातमीला दुजोरा दिला आहे. सलमानने सिनेइंडस्ट्रीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत तर दिलीच आहे पण आणखी काही ठिकाणीही त्यांनी अन्नधान्याची मदत केल्याचे समोर येत आहे. वांद्रा पूर्व भागातील आमदार जीशान सिद्दीकी यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. सलमानने केलेल्या मदतीचे त्यांनी यामध्ये आभार मानले आहेत.