Join us

‘ट्रिपल तलाक’वरील न्यायालयाचा निर्णय म्हणजे देशातील बहादूर मुस्लीम महिलांचा विजय - शबाना आझमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 4:31 PM

‘ट्रिपल तलाक’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे बॉलिवूडमध्ये स्वागत केले जात आहे. अभिनेत्री शबाना आजमी यांनी म्हटले की, ‘न्यायालयाचा ...

‘ट्रिपल तलाक’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे बॉलिवूडमध्ये स्वागत केले जात आहे. अभिनेत्री शबाना आजमी यांनी म्हटले की, ‘न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे देशातील बहादूर मुस्लीम महिलांचा विजय आहे.’ न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच शबाना यांनी ट्विट करीत म्हटले की, ‘मी सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्रिपल तलाक’प्रकरणी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करते. हा त्या बहादूरी मुस्लीम महिलांचा विजय आहे, ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून याविरोधात लढा दिला.’ सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकवर ३:२ च्या बहुमताने निर्णय दिला. या निर्णयात न्यायालयाने नमूद केले की, ‘मुस्लीम समुदायाची ट्रिपल तलाक पद्धत ‘असंवैधानिक, एकतर्फी आणि इस्लामचा भाग नाही.’ या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. शबाना एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ‘बालविकास, एड्स आणि न्यायदानाच्या क्षेत्रात त्या सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक नाटकांमध्ये सांप्रदायिकतेविरोधात आवाज उठविला आहे. त्याचबरोबर त्यांनी झोपडपट्टीत राहणारे, काश्मीर पंडित आणि लातूरमध्ये आलेल्या भूकंप पीडितांसाठी काम केले आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीमुळे शबाना यांना प्रचंड धक्का बसला होता. तेव्हापासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. दरम्यान, शबाना यांनी ‘ट्रिपल तलाक’विषयी व्यक्त केलेले मत इतरही बॉलिवूड कलाकारांना महत्त्वपूर्ण वाटत आहे. त्यांनीही शबाना यांच्याप्रमाणे न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘भारत मुस्लीम महिलांच्या सशक्तीकरणाचा एक नवा अध्याय सुरू करणार’ अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.