कोर्ट ड्रामा; हिट फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2016 10:22 AM
असं म्हटलं जाते की, कोर्टाची पायरी चढू नये. कारण पोलिसांचा घेरा, वकिलांचा युक्तिवाद, न्यायाधीशांचा हातोडा हे सर्व काही एखाद्या ...
असं म्हटलं जाते की, कोर्टाची पायरी चढू नये. कारण पोलिसांचा घेरा, वकिलांचा युक्तिवाद, न्यायाधीशांचा हातोडा हे सर्व काही एखाद्या वाईट स्वप्नासारखेच असते. त्यामुळे कोर्ट कचेरी म्हटलं की, मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही; मात्र हेच कोर्ट जेव्हा पडद्यावर पाहायला मिळते, तेव्हा मनात रोमांच निर्माण होतो. वकिलांचे डावपेच उत्सुकता वाढवितात. त्यातच जजने खडसावले किंवा खोचक टोमणा मारल्यास आपल्या चेहºयावर हसू खुलल्याशिवाय राहत नाही. याचा प्रत्यय नुुकत्याच रिलिज झालेल्या अक्षय कुमार याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटातून आला. चित्रपटातील कोर्ट ड्रामा प्रेक्षकांना तो एवढा भावला की, रुस्तम हा २०१६ मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर १५० कोटींपेक्षा अधिक कलेक्शन केले. १९६० मध्ये खरंतर या कोर्ट ड्रामाची सुरुवात आलेल्या बी. आर. चोपडा यांच्या ‘कानून’ या चित्रपटातून सुरू झाली. पुढे १९८३ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन, हेमामालिनी आणि रजनीकांत स्टार ‘अंधा कानून’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अक्षरश: खळबळ उडवून दिली. कारण, या चित्रपटाने व्यक्तिगत आयुष्यातदेखील दाखले दिले गेले. चित्रपटाचा लोकांवर एवढा प्रभाव पडला की, कोर्ट-कचेºयांचे विषय शहराबरोबरच गावातील चावडीवरदेखील चर्चिले जात होते. अर्थात, बॉलिवूडमध्येदेखील याचा प्रभाव वाढला अन् कोर्ट ड्रामा असलेले एकापाठोपाठ एक चित्रपट येत गेले. आजही हा सिलसिला सुरूच आहे. १९८५ मध्ये सुभाष घई दिग्दर्शित अनिल कपूर, मीनाक्षी शेषाद्री यांची भूमिका असलेला ‘मेरी जंग’ हा चित्रपट आला. न्यायालयातील दृश्य प्रेक्षकांना एवढे भावले की, काही दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड केले; मात्र याच काळात आलेल्या ‘आज का अंधा कानून’, ‘फर्ज और कानून’, ‘कानून अपना-अपना’, ‘कानून क्या करेगा’, ‘कायदा कानून’ आणि ‘कुदरत का कानून’ हे चित्रपट मात्र सपशेल अपयशी ठरले. १९९३ मध्ये राजकुमार संतोषी यांचा ‘दामिनी’ हा चित्रपट आला अन् पुन्हा कोर्ट ड्रामा लोकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटातील सनी देओल आणि अमरीश पुरी यांचे डायलॉग एवढे हिट झाले की, आजही ‘तारीख पे तारीख’ हा सनीपाजीचा डायलॉग प्रेक्षकांच्या मुखी आहे. ९० च्या दशकात या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तब्बल १७ कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता. २००४ मध्ये अब्बास-मस्तान यांनी कोर्ट ड्रामा याच थीमवर आधारित ‘ऐतराज’ हा चित्रपट आणला. प्रेक्षकांना तो इतका भावला की काही दिवसांमध्येच चित्रपटाने २४ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. चित्रपटातील वकिलाच्या भूमिकेत असलेल्या परेश रावल यांचे डावपेच तसेच पतीला (अक्षय कुमार) वाचविण्यासाठी पत्नीने (करीना कपूर) साकारलेली वकिलाची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. २०११ मध्ये आलेल्या ‘ओ माय गॉड’ या चित्रपटात तर दस्तुरखुद्द देवालाच न्यायालयात हजर केल्याचे दाखविण्यात आले. पुरावे आणि युक्तिवादात फसलेल्या देवाचा आधार घेऊन यातून कसा मार्ग काढला जातो याचा रोमांच निर्माण करणारा ड्रामा यामध्ये दाखविण्यात आला. तो प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला. त्यामुळे २० कोटी रुपयांमध्ये बनविलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तब्बल १८१ कोटी रुपयांचा बिझनेस केला. २०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटात दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी हाच ड्रामा जरा हटके पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. न्यायालयासारख्या गंभीर विषयाला कॉमेडीचा तडका लावून त्यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला. केवळ १० कोटी रुपयांमध्ये बनविलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी ३५ कोटी रुपये मिळवून दिले. चित्रपट सत्य घटनेवर आधारित असावा, असा भास प्रेक्षकांना अखेरपर्यंत झाला. काहीही असो कोर्ट ड्रामा हा बॉलिवूडचा हिट फॉर्म्युला ठरला हे निश्चित. कारण, वास्तविक जीवनात कायदेशीर लढाईने हतबल झालेले किंवा कायद्यातील त्रुटीविषयी मनात शंका असलेले प्रेक्षक या चित्रपटांना उदंड प्रतिसाद देतात. त्यातच जोवर नायकाच्या बाजूने निकाल दिला जातो, तोवर प्रेक्षक खिळून राहतात. जेव्हा विरोधीपक्षाच्या बाजूने निकाल जातात, तेव्हा त्यांच्या मनातील उत्कंठा वाढत जाते. कदाचित हेच या चित्रपटांच्या यशाचे गुपित असावे. ‘पिंक’ची प्रतिक्षाकोर्ट ड्रामा असलेला आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुजीत सरकार यांनी दिग्दर्शित केलेला ‘पिंक’ हा चित्रपट पूर्णत: कोर्ट ड्रामावर आधारित आहे. चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन वकीलाच्या मुख्य भूमिकेत आहेत. एका बलात्कारपीडित तरुणींची यात कायदेशीर लढाई दाखविण्यात आली असून, वकीलांमधील युक्तिवाद उत्कंठा वाढविणारे असतील, यात शंका नाही.