कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील ज्युनिअर आर्टिस्टवर उपासमारीची वेळ आली आहे. स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, प्रोडक्शनशी संबंधित लोकांची सध्या अतिशय भयानक स्थिती आहे. त्यांच्या घरात अन्न शिजवायला देखील नसल्याने त्यांना मदत करण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. अभिनेता सलमान खान या लोकांना आर्थिक मदत करणार असल्याचे त्याने गेल्या आठवड्यात सांगितले होते. यासाठी त्याने या कामगांराचे बँक डिटेल्स देखील मागवले होते.
आता सलमानने या कर्मचाऱ्यांच्या बँकेत पैसे टाकायला सुरुवात केली आहे. त्याने आतापर्यंत कामगाराच्या अकाऊंटमध्ये जवळजवळ चार कोटी ८० लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. सध्या भारतात असलेली परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील महिन्यात देखील सलमान या कामगारांच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकणार आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनुसार या कामगारांची संख्या जवळजवळ १९ हजार असून त्यातील तीन हजार मजूरांच्या खात्यात यश राज फिल्मसने पाच हजार रुपये टाकले आहेत तर सलमानने १६ हजार कामगारांच्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये टाकले आहेत. सलमानने आतापर्यंत चार कोटी ८० लाख कामगारांच्या अकाऊंटमध्ये टाकले असून पुढील महिन्यात देखील चित्रीकरण सुरू न झाल्यास संपूर्ण १९ हजार लोकांच्या अकाऊंटमध्ये सलमान पैसे टाकणार आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे.