नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या दैदिप्यमान तेजस्वी पराक्रमाची गाथा सांगणारा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटावर सध्या प्रेक्षकांच्या उड्या पडताहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा सिनेमा सगळीकडे हाऊसफुल सुरु आहे. ही भव्यदिव्य कलाकृती साकारताना दिग्दर्शक ओम राऊत व त्यांच्या टीमने अपार मेहनत घेतली, त्याच मेहनतीचे फळ बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या रूपात आता समोर आले आहे. या चित्रपटाचा एक मेकिंग व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही त्याची प्रचिती येईल. ‘तान्हाजी’च्या पडद्यामागची दृश्ये दाखवणारा हा व्हिडीओ अजय देवगणने पोस्ट केला आहे. यात दिग्दर्शक ओम राऊत व त्यांची टीम बोलताना दिसतेय.
या चित्रपटात संधन दरीतील एक साहसदृश्य आहे. जवळपास ३०० फूट खोल दरीतील हे दृश्य साकारण्यासाठी ‘तान्हाजी’च्या टीमने किती मेहनत केली, हे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्ट होते. 300 फूट खोल दरी स्टुडिओत हुबेहूब दाखवायची होती. सेटवर ही दरी साकारणे ओम राऊत व त्यांच्या टीमसाठी सर्वात मोठे आव्हान होते. हे दृश्य, ती दरी कशी साकारली गेली, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. होय, ही दरी स्टुडिओत साकारण्यासाठी प्रॉडक्शन डिझाइन श्रीराम अय्यंगर आणि सुजीत सावंत यांनी त्या दरीतील काही खडक आणले. यानंतर त्या आकाराची भिंत स्टुडिओत बांधली आणि मग वीएफएक्सच्या मदतीने त्या भिंतीला दरीचे रुप देण्यात आले.
‘तान्हाजी’ची अख्खी टीम या चित्रपटावर तब्बल तीन वर्षे खपत होती. चित्रपटातील अंगावर धावून येणारे युद्धाचे प्रसंग, साहस दृश्ये हे सगळे साकारण्यासाठी विदेशातील काही अॅक्शन डायरेक्टर बोलवण्यात आले होते. टीमची हीच मेहनत फळास आली, असे म्हणायला हरकत नाही.रिलीजच्या 11 व्या दिवशी या चित्रपटाने 8.17 कोटींचा बिझनेस केला आणि काल 12 व्या दिवशी सुमारे 7 कोटींची कमाई केली. यासोबतच ‘तान्हाजी’च्या एकूण कमाईचा आकडा 182 कोटींवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत अजयचा हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असे मानले जात आहे. या चित्रपटाचा बजेट 125 कोटी रूपये आहे. हा बजेट कधीच वसूल झाला आहे. सुमारे 3500 स्क्रिन्सवर रिलीज झालेला ‘तान्हाजी’ ओम राऊतने दिग्दर्शित केला असून अजय देवगण व भूषण कुमार या दोघांची निर्मिती आहे.