अभिनेता शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान झालेल्या अपघातात एका क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खबर आहे. उत्तराखंडातील डेहराडून येथे या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. याच शूटींगच्यावेळी हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शूटींगसाठी डेहराडूनहून एक जनरेटर मागवण्यात आले होते. या जनरेटरमध्ये आॅईल तपासत असताना त्याचा टेक्नीशियन राजकुमार याचे मफलर जनरेटीच्या पंख्यामध्ये अडकले. यात राजकुमारही पंख्यात ओढला गेला. या प्रकाराने सेटवर एकच खळबळ उडाली. राजकुमारला तातडीने सेंट मेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात हालवण्याचा सल्ला दिला. तथापि मॅक्सच्या डॉक्टरांनी राजकुमारला मृत घोषित केले.
राजकुमार हा डेहराडूनचा रहिवासी असल्याचे कळतेय. या अपघाताची कल्पना त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
‘कबीर सिंह’ हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित करत आहेत. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपटही संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. काही दिवसांपूर्वीच शाहिदने ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. या चित्रपटात शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद सोबत या चित्रपटात कियारा आडवाणी दिसणार आहे.