नवी दिल्ली - गोव्यामध्ये सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युकी हेड नदव लापिड यांनी काश्मिर फाईल्स चित्रपटावर अश्लील आणि प्रोपेगेंडा फिल्म अशी टीका केली होती. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली होती. दरम्यान, भारतामधील इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. तसेच त्यांनी लापिड यांना खुलं पत्र लिहून त्यांची कडक शब्दात कानउघाडणी केली आहे.
इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, भारत आणि इस्राइल हे दोन देश आणि या देशांमधील लोकांमधील मैत्री खूप मजबूत आहे. नदव लापिड तुम्ही जे नुकसान केले आहे. ते भरून येईल. मात्र एक व्यक्ती म्हणून मला लाज वाटते. तसेच मी आम्ही आमच्या यजमान देशाची त्या वर्तनासाठी माफी मागतो. त्यांचं औदार्य आणि मैत्रीची परतफेड आम्ही अशी केलीय.
दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी इस्राइली राजदूत नाओर गिलोन यांनी केलेल्या विधानाचं समर्थन करत ते रीट्विट केले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आयोजित होत असतो.
गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात द काश्मिर फाईल्स चित्रपटाचं स्क्रिनिंग झाल्याने ज्युरी हेड नदव लापिड यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तसेच हा चित्रपट पाहून तो केवळ प्रचारकी आणि व्हल्गर आहे, असं वाटलं. अशा प्रकारचे चित्रपट एका प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात आणि कलात्मक, स्पर्धात्मक वर्गासाठी योग्य नाहीत, असं विधान केलं होतं.
दरम्यान, इस्राइलचे राजतून नाओर गिलोन यांनी नदव लापिड यांची कठोर शब्दात कानउघाडणी केली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्याला देव मानले जाते. तुम्ही चित्रपट महोत्सवात परीक्षकांच्या पॅनलच्या अध्यक्षपदासाठी भारताने दिलेल्या निमंत्रणाचा वाईट पद्धतीने गैरवापर केला आहे. तसेच भारताने तुमच्यावर जो विश्वास दर्शवला, आदरातिथ्य केले त्याचाही अपमान केला आहे. तुम्ही जे वर्तन केले त्यासाठी मी तुम्हाला आत्मपरिक्षणाची गरज आहे, असा सल्ला मी देतो, असेही इस्राइली राजदूत म्हणाले.