मुंबई - क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. NCB ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या (Imtiyaz Khatri) बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. यासंदर्भात स्वतः NCB नेच शनिवारी माहिती दिली. सध्या, अधिकारी तपास करत आहेत. यापूर्वी, 2 ऑक्टोबरला कॉर्डेलिया जहाजावरील कारवाईत एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही लोकांना अटक केली आहे.
इम्तियाजचे बॉलीवुडमधील मोठ-मोठ्या स्टार्सशीही संबंध आहेत. यापूर्वीही त्याच्यावर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स सप्लाय संदर्भात आरोप झाला आहे.
इम्तियाजवर यापूर्वीही झाले आहेत आरोप -सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय प्रत्येक अँगलने तपास करत आहे. सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली होती. याच दरम्यान इम्यतियाजसंदर्भातही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सुशांत आणि इम्तियाजचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुशांत प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर इम्तियाज गायब झाला होता. तेव्हापासूनच त्याच्यावरील संशय बळावला होता.
कोण आहे इम्तियाज खत्री -इम्तियाज खत्री पेशाने एका बिल्डर आहे. त्याचे बॉलिवूडमधील अनेक बड्या लोकांशी फार जवळचे संबंध आहेत. त्याची INK इंफ्रास्ट्रक्चर नावाची कंपनीही आहे. इम्तियाज बॉलीवुड चित्रपटांतही पैसा लावतो.
तत्पूर्वी, श्रृती मोदीने खत्री नावाच्या व्यक्तीवर सुशांतला ड्रग्स सप्लाय केल्याचा आरोपही केला होता. ती म्हणाली होती, की एक खत्री नावाची व्यक्ती सुशांतला ड्रग्स सप्लाय करत होती. मात्र, मला त्याचे संपूर्ण नाव माहीत नाही. श्रृती ही सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती.