दहिहंडीचा उत्सव काही दिवसांवरच येऊन पोहचला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गोविंदा मानवी मनोरे उभारून दहिहंडी फोडतात. मुंबईसारख्या शहरात तर हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो. अनेक मोठमोठी मंडळे दहिहंडीचा उत्सव आयोजित करतात. दरवर्षी बॉलिवूडमधील कलाकार मंडळी या उत्सवांची रंगत वाढवतात.
बॉलिवूडमधील सिनेमांनाही या उत्सवाने भुरळ घातलीये. ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळापासूनच दहिहंडीचा हा उत्सव हिंदी सिनेमांमध्ये बघायला मिळतो. शम्मी कपूर, अमिताभ बच्चन, प्रभु देवा, सोनाक्षी सिन्हा या कलाकारांनी दहिहंडीच्या उत्सवावर आधारीत या गाण्यात सादरीकरण केलंय. असीच काही गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.
‘गोविंदा आला रे आला’
दहिहंडीला सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं म्हणजे ‘गोविंदा आला रे आला’. हे गाणं शम्मी कपूर यांच्या ‘ब्लफ मास्टर’ या सिनेमातील असून या गाण्याचे अनेक व्हर्जन ऎकायला मिळतात.
'मच गया शोर सारी नगरी रे'
अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांच्यावर चित्रित हे गाणंही दहिहंडीमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. ८० च्या दशकातील हे फार गाजलेलं गाणं आजही ठेका धरायला लावतं. हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं आहे.
‘गो गो गो गोविंदा’
‘ओ माय गॉड’ या गेल्यावर्षी येऊन गेलेल्या सिनेमातील ‘गो गो गो गोविंदा’ हे गाणंही चांगलंच लोकप्रिय झालं होतं. आजही दहिहंडीमध्ये या गाण्यावर लोकं ताल धरताना दिसतात. सोनाक्षी सिन्हा आणि प्रभु देवा यांचा तूफानी डान्सही यात बघायला मिळतो.
'आला रे आला गोविंदा आला'
दोन हिरो मानवी मनोऱ्यांवर उभे राहून दहीहंडी फोडताहेत असं चित्र फार क्वचित बघायला मिळतं. हे चित्र 'काला बाजार' या सिनेमात बघायला मिळालं. अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.
'चांदी की डाल पर'
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याचंही गाणं दहिहंडीला चांगलंच गाजतं. हेलो ब्रदर या सिनेमातील हे गाणं असून यात राणी मुखर्जीही आहे.
'हर तरफ है ये शोर'
संजय दत्त याच्या 'वास्तव' सिनेमातील 'हर तरफ है ये शोर' हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे, जितकं सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा होतं.
'शोर मच गया शोर'
'शोर मच गया शोर' हे १९७४ मध्ये आलेल्या 'बदला' सिनेमातील आहे. हे गाणं अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.