बॉलीवुडच्या सिनेमात आज विविध आयटम गर्ल आपला डान्स, मादक अदांनी रसिकांना घायाळ करतात. सिनेमाला यशस्वी करण्यासाठी त्यात गाण्यांसोबत एक तरी आयटम डान्स असावा असा निर्माता आणि दिग्दर्शकांचा आग्रह असतो. याच आयटम डान्समुळे सिनेमाची वेगळी प्रसिद्धी होते. त्यामुळेच सध्या आयटम नंबर आणि आयटम गर्ल्सचा जमाना आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. मात्र बॉलीवुडच्या पहिल्या आयटम गर्लचा मान हा अभिनेत्री हेलन यांनाच जातो.
हिंदी सिनेमांमध्ये आयटम नंबर सुरु करण्याचं श्रेय हे हेलन यांनाच जातं. दिलखेचक अदा, घायाळ करणारं नृत्य यानं हेलन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. कॅब्रे डान्स भारतात लोकप्रिय करण्याचं श्रेयसुद्धा हेलन यांनाच जातं. मात्र हेलन यांना करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल सहन करावा लागला. जपाननं बर्मावर वर्चस्व स्थापित केले त्यावेळी अनेक कुटुंब स्थलांतरीत झाली.
वडिलांच्या निधनानंतर हेलनही आपल्यासोबत मुंबईच्या दिशेने निघाल्या. मात्र प्रवासादरम्यान आईचे मिसकॅरेज झाल्याने त्यांनी कोलकातामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. याच ठिकाणी हेलनजींचा जगण्याचा आणि करिअरसाठी संघर्ष सुरु झाला. वयाच्या 19 वर्षी त्यांना हावडा ब्रिज या सिनेमात पहिली संधी मिळाली. यातील मेरा नाम चुन चुन या गाण्याने रसिकांना वेड लावलं. यामुळे बॉलीवुडच्या पहिल्या आयटम गर्ल अशी ओळख त्यांना मिळाली.
60च्या दशकात हेलन यांच्याकडे सेक्स सिम्बल म्हणून पाहिलं जाऊ लागलं. हेलन यांनी आपल्या डान्ससह सौंदर्यानं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. मात्र त्यांचं हेच सौंदर्य त्यांना त्रासदायक ठरु लागलं. सुंदर असल्याचा त्रासही त्यांना सहन करावा लागला. कधी कधी तर त्यांना छेडछाडीचा त्रासही सहन करावा लागला. मात्र घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना काम थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे या छेडछाडीचा सामना करण्यासाठी त्यांनी एक शक्कल शोधून काढली.
शुटिंगला जाताना हेलनजी बुरखा घालून घरातून बाहेर पडू लागल्या. त्यामुळे हेलनजींना ओळखणं शक्य नव्हतं. अशाप्रकारे त्यांनी छेडछाडीपासून स्वतःचा बचाव केला. प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या हेलन या ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या दुस-या पत्नी आहे. दबंग खान सलमानच्या हेलन या सावत्र आई आहेत. मात्र आई म्हणून सलमान त्यांचा आपल्या आई इतकाच आदर करतो.