दिवार, अमर अकबर अन्थॉनी, सुहाग, कालिया, नमक हलाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये परवीन बाबी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. परवीन बाबी यांनी सत्तर आणि ऐंशीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
परवीन बाबी यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे महेश भट, डॅनी डेन्झोपा, कबीर बेदी यांच्यासोबतची प्रेमप्रकरणं चांगलीच गाजली. डॅनी आणि त्यांच्या नात्याविषयी तर डॅनी यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. डॅनी आणि परवीन बाबी यांच्या नात्याबद्दल डॅनी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. परवीन या खूप चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगल्या व्यक्ती होत्या असे देखील डॅनीने या मुलाखतीत कबूल केले होते.
डॅनी यांनी या मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि परवीन एकमेकांच्या आयुष्यात आलो, त्यावेळी खूपच तरुण होतो. जवळजवळ चार वर्षं आम्ही एकत्र राहिलो. त्याकाळासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. पण काही वर्षांनंतर आम्ही वेगळे व्हायचे ठरवले. पण त्यानंतरही आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो. त्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर (कबीर बेदी) आला. कबीरसोबत ब्रेक अप झाल्यानंतर काही वर्षं ती महेश भट्टसोबत नात्यात होती.
या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले होते की, आम्ही दोघे अनेक वर्षं जुहूमधील एकाच सोसायटीत राहात होतो. आम्ही वेगळे झाल्यावरनंतरही अनेकवेळा ती मला जेवायला घरी बोलवायची. त्यावेळी मी अभिनेत्री किमसोबत नात्यात होतो. पण याची पर्वा परवीनला नव्हती. ती कोणत्याही वेळी माझ्या घरी यायची. किमसाठी हे सगळे समजणे खूपच अवघड होते. काही वेळा तर किमचे चित्रीकरण आटपल्यानंतर मी तिला चित्रपटाच्या सेटवरून माझ्या घरी घेऊन यायचो तर माझ्या घरात परवीन असायची. ती चक्क बेडरूममध्ये बसून व्हीसीआरवर चित्रपट पाहात राहायची. तिचे हे वागणे मला आणि किमला विचित्र वाटायचे. पण त्यावर आपण केवळ फ्रेंड्स आहोत... आपल्यात तसे काहीही नाहीये असे म्हणते ती जोराजोरात हसायची.