बॉलिवूड अभिनेता सनी देओल (sunny deol) सध्या त्याच्या 'गदर 2' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला असून तो रिलीज झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे. इतंकच नाही तर सनी देओल पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचे अनेक किस्से, घटना सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत. यामध्येच सनी देओल आणि शाहरुख खान (shahrukh khan) यांच्यातील एक जुना वाद चर्चिला जात आहे.
सनी देओल आणि शाहरुख खान हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जातात. या दोघांनाही आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, एका सिनेमामुळे या जोडीत मतभेद निर्माण झाले आणि ते जवळपास १६ वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते.
१९९३ मध्ये यश चोप्रा यांचा डर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अलिकडेच या सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाले. परंतु, या सिनेमामुळे सनी आणि शाहरुख यांच्यात कमालीचे मतभेद निर्माण झाले होते. सध्या त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली आहे. परंतु, यापूर्वी तब्बल १६ वर्ष ते एकमेकांशी बोलत नव्हतं. त्यांच्यातील या मतभेदांवर सनीने 'PTI'ला मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
"मी त्याचे आभार मानतो. मला आठवतंय की, तो दुबईमध्ये जवानचं प्रमोशन करत होता. त्यावेळी मी त्याच्याशी बोललो होतं. मला वाटलं नव्हतं इतक्या बिझी शेड्यूलमधूनही तो गदर २ च्या सक्सेस पार्टीत आला होता. पण, त्या गडबड गोंधळात मला त्याच्याशी बोलायला किंवा भेटायला वेळ मिळाला नाही. पण, जेव्हा ही संधी मिळेल मला खरंच त्याला भेटायला आवडेल", असं सनी देओल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "जसजसा काळ पुढे सरकतो आपण मॅच्युअर व्हायला लागतो आणि त्यातून मग कळायला लागतं की जीवनाचा नेमका अर्थ काय आहे. आपल्या सगळ्यांमध्येच तो बदल होत जातो. वेळ सगळ्या गोष्टींवर रामबाण उपाय आहे हेच खरं."
'या' कारणामुळे १६ वर्ष होता सनी-शाहरुखचा अबोला
डर सिनेमामध्ये सनी आणि शाहरुख या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. परंतु, या सिनेमाच्या क्लायमॅक्सवरुन सनीचं यश चोप्रांसोबत मतभेद झाले होते. या सिनेमात क्लायमॅक्सनंतर खलनायकाला (शाहरुख खान) ज्याप्रमाणे महत्त्व दिलं होतं ते त्याला मान्य नव्हतं. या वादानंतर शाहरुख आणि सनी यांच्यात मतभेद झाले होते.