Devendra Fadnavis On Sushant Singh Rajput Case:बॉलिवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस गोष्ट हाती लागल्याचे पाहायला मिळालेले नाही. तीन वर्षांपूर्वी राहत्या घरात सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह आढळला होता. तो त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबद्दल सातत्याने चर्चा होत होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता, पण तीन वर्षे उलटूनही तपासात फार प्रगती झालेली दिसली नाही. मात्र, याबाबत आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची अपडेट दिली. अनेकविध प्रकारचे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले होते. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणीही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले. सुरुवातीला या प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे नव्हते. उपलब्ध माहिती ऐकीव माहितीवर आधारित होती, नंतर काही लोकांनी ठामपणे सांगितलं की त्यांच्याकडे खटल्याच्या संदर्भात ठोस पुरावे आहेत. त्यानंतर त्या लोकांशी संपर्क साधण्यात आला आणि पोलिसांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
योग्य वेळ आल्यावर मी त्यासंदर्भात बोलेन
सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता अधिकारी तपासत आहेत. ते पुरावे विश्वासार्ह असतील तर त्याच्या आधारे नक्कीच कारवाई केली जाईल. मात्र सध्या मी या प्रकरणावर कोणतंही भाष्य करणे घाईचे ठरेल, योग्य वेळ आल्यावर मी त्यासंदर्भात बोलेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी नवीन अपडेट दिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.