बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील. अमरीश पुरी यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. खरे तर इतर अभिनेत्यांप्रमाणे तेही हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण निर्मात्यांनी त्यांचा चेहरा पाहून त्यांना हिरोची भूमिका नाकारली होती.
अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आधीपासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते. मोठ्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत दाखल आले. पण पहिल्याच स्क्रिन टेस्टमध्ये ते अपयशी ठरले. तुझा चेहरा हिरोसारखा नाही, असे म्हणून निर्मात्यांनी अमरीश पुरी यांना परत पाठवले होते. यानंतर अमरीश यांनी विमा विभागात नोकरी करायला सुरुवात केली. पण तरीही अभिनयाचा किडा त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. त्यांनी पृथ्वी थिएटरमधील नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. पुढे खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली. एकवेळ अशी होती की, अमरिश पुरी चित्रपटात काम करण्यासाठी नायकापेक्षा अधिक मानधन मिळत असे.
अमरिश पुरी विमा कंपनीत काम करत असताना त्यांची ओळख उर्मिला दिवेकर यांच्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काहीच वर्षांत म्हणजेच त्यांनी ५ जानेवारी १९५७ ला लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलीचे नाव नम्रता आहे. नम्रता ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ती कॉस्च्युम डिझायनर देखील आहे. तर त्यांचा मुलगा राजीव हा बिझनेसमन आहे.
अमरिश पुरी यांनी हिंदी प्रमाणेच मराठी, कन्नड, पंजाबी, तेलगू, तामीळ, इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील बलदेव सिंग, करण अर्जुन मधील दुर्जन सिंग, गदर एक प्रेम कथा मधील अशरफ अली, मिस्टर इंडिया या चित्रपटातील मॉगॅम्बो, नायक चित्रपटातील मुख्यमंत्री यांसारख्या त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.